Monday, April 29, 2024
Homeजळगावनवरात्रौत्सव विशेष : प्रत्येक यशामागे महिला तरीही महिलांवर अत्याचार का?

नवरात्रौत्सव विशेष : प्रत्येक यशामागे महिला तरीही महिलांवर अत्याचार का?

जळगाव : jalgaon

आज यशोशिखरावर असलेल्या पुरूषांना किंवा महिलांना त्यांच्या यशामागचे कारण कोणते असे विचारले तर तो किंवा ती आई, बहिण, पत्नी अशी नावे सांगत असतो. हे केवळ यशोशिखरावर असलेल्यांचे नव्हे तर सर्वच पुरूषांच्या व महिलांच्या बाबतीत हे सत्य आहे. पुरूष किंवा स्त्री यांना सुस्कारीत करून त्यांना योग्य दिशा दाखवत त्यांना अपयश आले तरीही खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द, प्रेरणा देण्याचे काम महिला या करत असतात. मग कधी ती आई असते, कधी बहिण असते कधी पत्नी असते तर कधी मैत्रिणीही असते. एकूण महिलांशिवाय पुरूषांचे जगणे अशक्य असतांनाही पुरूषांकडून महिलांवर अत्याचारच्या घटना घडत असतात. अत्याचार करणार्‍यांना कायद्याने शिक्षा असली तरी कायद्याच्या पळवाटा शोधून ते उजळ माथ्याने परत नवा अत्याचार करण्यास मोकळे असतात. त्यामुळे आता महिलांनी आत्मनिर्भर होत स्वावलंबी होण्याचा सूर आजच्या महिलांच्या प्रतिक्रियांतून निघाला.

- Advertisement -

स्वत:साठी आवाज उठवावा

नवरात्री ही सर्वांसाठी प्रेरणादायीच. आपण अशा देशात राहतो जिथे फक्त महिला दिन आणि नवरात्रीमध्ये स्त्रियांच्या सन्मानाचे सोहळे होतात, मात्र इतर दिवस सन्मान तर सोडाच मानसिक, शारीरिक अत्याचाराला त्यांना बळी पडावे लागते. नवरात्रीमध्ये देवी म्हणून स्त्रीची पूजा करतो मात्र पूजा करण्यापेक्षा स्त्रीचा सन्मान व्हावा. अत्याचार करणार्‍याला कायदेशीर कचाट्यातील कटकटी संपत नाही तोपर्यंत सरकार त्याला वर्षानुवर्षे पोसते. लवकर कारवाई होत नाही त्यामुळे कठोर शिक्षा न झाल्याने कायद्याची भितीच राहत नाही. त्यामुळे अत्याचार करणार्‍यांचे बळ वाढते यातुनच सर्वसामान्य महिला असूरक्षित असल्याच्या भावनेसह जगतात. जोपर्यंत आपण स्वतः साठी आवाज उठवत नाही, स्वतःचे रक्षण करत नाही तोपर्यंत देव ही आपल्यासाठी धावून येत नाही म्हणून परिस्थिती कोणतीही असो आधी स्वतःचे सोबती बना.स्वतः वर प्रेम करा. काळजी घ्या. अपेक्षा सोडून द्या म्हणजे तुम्ही कधीच दुःखी होणार नाही.

सौ. दिपिका देवेंद्र पाटील, जळगाव

महिला- युवतींनी संस्कार जपावेत!

आज सर्वत्र रुढी परंपरा आणि संस्कारांचा र्‍हास होताना दिसतो. समाजातील अनेक कर्मठ परंपरा कालपरत्वे सुलभ झाल्या, तर काही लुप्त झाल्यात. परंतु आपण स्त्री म्हणून आपल्यावर येणार्‍या सुसंस्कृत पिढी घडविण्याची जबाबदारी नक्कीच सक्षमपणे पार पाडण्याची गरज आहे. संस्कार म्हणजे ओझे न समजता त्यामागचा उद्देश प्रत्येकीने समजून घ्यावा. विवाह म्हणजे मुलीच्या दृष्टीने तीच्या जीवनातील मैलाचा दगड असतो. मात्र ’चलता है’ च्या आजच्या जमान्यात आपण काहीही खपवून घेत आहोत. मुलींना मिळालेल्या कि मिळविलेल्या कथीत उदारमतवादी वृत्तीमुळे त्या संकट ओढवून घेतांना दिसतात. परवाचीच मुंबईची एक घटना पाहता विवाहाचा सुसंस्कार आपण जाणून असणार्‍या परंपरामध्ये झाला तर जगणं सुसह्य होतं. पण आंधळ्या प्रेमाच्या आड भिन्न धर्मात रुढी परंपरामध्ये विवाह करुन आपण संकट तर ओढवून घेत नाहीत ना?याचा विचार युवतींनी करण्याची गरज आहे. तुम्हांला जाळ्यात फसवून कोणी जिहादी हेतू तर बाळगत नाही ना?याचाही सारासार विचार केला पाहिजे. युवतींच्या कडून चुकीचे पाऊल पडणार नाही म्हणून पालकांनी सजग राहण्याची गरज आहे.

सौ.रंजना श्रीकांत नेवे ,संचालिका,तापी शेतकरी सह.सूतगिरणी,चोपडा

स्त्रीयांनी आत्मनिर्भर होणे आवश्यक

स्त्रीला आई, बहीण, पत्नी, सून, सासू, मैत्रीण, मुलगी अशा भूमिका पार पाडाव्या लागतात. सध्या मुलींवर अत्याचारासह त्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे महिलांनी स्व-संरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे व शस्त्र चालवणे शिकलं पाहिजे. कारण विविध कारणांसाठी मुलींना आणि महिलांना घराबाहेर पडावे लागते. अशावेळी स्वरक्षण करण्यासाठी कराटे सारखे प्रशिक्षण हवेच. तसेच आपण कोणत्या वेळेला कोठे आणि कोणत्या मार्गाने ,किती वेळ जाणार आहे याची माहिती घरच्यांना देणे गरजेचे आहे. ही बाबत व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधणे असल्यासारखी वाटत असली तरी ती संकट काळात तुम्हाला मदत मिळण्यासाठी सोईचे होईल. आईने मुली सोबतच मुलांचीही जवळची मैत्रीण होत त्यांच्यासोबत सुसंवाद साधणे गरजेचे आहे. यामुळे मुलगा किंवा मुलगी वेगळ्या मार्गाला जाणार नाहीत. प्रत्येक विवाहितेने सासू सासार्‍यांमध्ये आई- वडिलांना बघावे. म्हणजे सासरचं माहेर होईल आणि घर हे नंदनवन होईल.

प्रियंका निलेश वाणी, भुसावळ

महिला सबलीकरण

भारताला सक्षम व महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महिला सबलीकरण आवश्यक आहे. प्रत्येक महिला आपल्या हक्कासाठी आणि स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते, लढू शकते. फक्त तिला साथ पाहिजे. कमवणारी स्त्री सक्षम केव्हा होईल जेव्हा प्रत्येक गोष्टीत तिच्या विचारांचा विचार केला जाईल. पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्त्री जातीला कमी लेखले जाते. स्त्री ला समान वागणूक मिळाली पाहिजे. तिला तिचा हक्क तिचा निर्णय सांगण्याची क्षमता बोलू दिली पाहिजे तरच स्त्री सबळ बनू शकते.

शिक्षणाच्या अभावामुळे स्त्रियांना समान संधी मिळत नाही. काही महिला कमी शिक्षित असल्या तरी आर्थिक व्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात. एका गुणवान महिलेने शिवाजी महाराजांना घडविले. स्त्री मध्ये खूप मोठी शक्ती आहे. ती एकच नाही तर दोन घरांचा उध्दार करते. आपल्या लेकीच्या जन्माचे स्वागत करा, तिला तिच्या आंतरिक शक्तीची जाणीव पावलो पावलात करून द्या. तिला स्त्रीत्वाच्या नावाखाली मागे खेचू नका. मुलामुलींमध्ये भेद न करता समानतेची वागणुक द्या. संस्कारीत करा. त्याच्या भावना समजून त्यांना त्याच्या जबाबदारीची व होणार्‍या परिणामांची जाणिव करून द्या. स्त्री सक्षम आहे ती सबला होती सबला आहे सबला राहणार.

सौ. दिपाली पोपट पाटील, मु.पो.एकुलती.जामनेर

स्त्री सक्षमीकरणामुळे देशाच्या विकासाला दिशा

आज काही अपवाद सोडले तर आपल्या देशात स्त्री स्वातंत्र्याविषयी सकारात्मक बदल घडून आलेले आहेत. राजकीय, सामाजिक स्तरावरून खूप मोठया प्रमाणावर स्त्री सक्षमीकरणासाठी प्रयत्न झालेले दिसून येतात. याचेच परिणाम म्हणून आज स्रिया विविध क्षेत्रात प्रभावीपणे आपले कार्य करत आहेत इतकेच नव्हे तर आज आपल्या देशाची एक सर्वसामान्य स्त्री राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळत आहेत हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज देशाच्या विकासात स्रियांचे महत्वाचे योगदान आहे. तरीदेखील अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर स्त्री स्वातंत्र्याविषयी जागृती होणे गरजेचे आहे. स्रियांनी देखील काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. हे बदल घडवूून आणतांना मात्र आपल्या भारतीय मूळ संस्कृतीला विसरू नये.आधुनिकीकरणाच्या नावाखाली स्वैराचार करणे चुकीचे ठरेल. स्त्रियांना घरासह सामाजिक ठिकाणी सुरक्षितता प्रदान करणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणिव असावी.

सौ. अपर्णा किरण पाटील सरपंच, शेळावे बु. शेळावे ता पारोळा

सह्याद्रीची कणखरता तू …

’सह्याद्रीची कणखरता तू …

सृष्टीची या निर्माती तू …

अबला नाही सबला तू…

दुष्प्रवृत्तीचा कर्दनकाळ तू…

महिलेशिवाय एखाद्या घराची कल्पना करणे अशक्यच! अंगणातल्या रांगोळी पासून तर घरातल्या सुई धाग्या पर्यंत स्री चे लक्ष असते. स्री आपला संसार आणि कर्तव्य चक्रात इतकी गुरफटून जाते की आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपले देखील अस्तित्व आहे. आपल्याला देखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे. या सर्व गोष्टी ती विसरून जाते. म्हणून परिवारातील सदस्यांनी किमान एक दिवस तीला या कामांपासून सुटी देत तीच्या आवडीच्या बाबी कराव्यात. त्यामुळे जसे तीचे तुमच्यावर प्रेम आहे तेवढेच प्रेम परिवारातील सर्व सदस्यांचे तीच्यावर आहे याची जाणीव होईल. हे केवळ शो म्हणून नव्हे तर मनापासून करावे. महिला हे शक्तीचे रूप आहे पण त्याची जाणीव आजच्या काही महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

’उठ भगिनी जागी हो,

चंडी दुर्गा काली हो,

अबला नको रणरागिणी हो,

रणात लढणारी आदिशक्ती हो,

दुर्गेची तू रणरागिणी हो’

भावना निखिल पाटील, शिक्षिका, जे. टी. महाजन इंग्लिश मेडियम स्कूल न्हावी मार्ग फैजपूर.

घटस्थापनेतील देवीचे महात्म्य कायमच

आज नवरात्राचा उत्साह सर्वत्र दिसतोय.मंदिरे सजलीत. घरोघरी घटस्थापना झाली आहे. घटाभोवतीच्या मातीतून हिरवे अंकुर फुटू लागले आहेत. देवीला सुगंधी पुष्पमाला घातलेल्या आहेत. शेजारी सुंदर रांगोळी रेखाटल्या आहेत. अखंड तेवणार्‍या आनंद नंदादीपाच्या ज्योतीच्या प्रकाशाने उजळलेले देवघर सर्वांना सुखावत आहे. प्रसन्न अंतकरणी कुटुंबिय आपल्या कुलदेवीच्या पूजनात रममाण आहेत. प्रत्येक घरात त्या घराण्याच्या देवीच्या पारंपरिक आरती आहे. संतांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन त्यात घडतेय. आपल्या घराण्यातील पूर्वज या देवतेची पुजाअर्चा करायचे.जगावर आजवर कितीतरी संकटे येवून गेलीत. अगदी अनाकलनीय. अविश्वसनीय वाटणारी पण तरीसुद्धा आपल्या या कुलदेवतेच्या कृपेने आजही आपले संसार आनंदात सुरु आहेत.आपल्या घराण्याची वंशवेल कधीच खुंटलेली नाही. कुलदेवीच्या कृपेने हे आपले गोकुळ आनंदी आहे. घराण्यावर आईचा वरदहस्त रहावा. कृपादृष्टी रहावी.आशीर्वाद लाभावेत म्हणून हा कुलदेवी पूजनाचा वसा मग पुढील पिढीकडे असा जात राहतोय. अशी ही श्रद्धायुक्त परंपरा घरोघरी किती वर्षे सुरु आहे हे सांगणेही अवघडच. कुलदेवीच्या पूजा अर्चनेचा हा नवरात्र उत्सवाचा कालावधी म्हणजे भक्तांसाठी आनंदपर्वच.

सौ. पुजा संदीप कुंटे-पाटील गुढे. ता.भडगाव.

न स्त्री स्वातंत्र्यमर्हती ..

भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीला आदराचे स्थान आहे. न स्त्री स्वातंत्र्यमर्हती हा काळ केव्हाच काळाच्या पडद्याआड गेलाय.नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा जागर.. समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी आपण सबलीकरणाचे अभियान राबवण्यास सुरुवात करतो. पण त्याचवेळी या समाजाला हा प्रश्नही विचारावासा वाटतो की, खरंच महिला सबलीकरण होत आहे का? त्यांना त्यांचे अधिकार खरेच दिले जात आहेत का? रोज महिलांवर मुलींवर होणार्‍या अत्याचाराच्या बातम्या पाहिल्या की त्यांना खरे संरक्षण मिळत आहे का? म्हणून मला असे वाटते की वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनवणे ही समाजाची जबाबदारी आहे. हे करत असताना पुरुषांना हिणवणे किंवा पुरुषांपेक्षा स्त्रियांना श्रेष्ठ सिद्ध करणे हा उद्देश नसून महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागणे होय स्त्री शक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वावलंबन हे चार आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर देश विकसित होण्यास वेळ लागणार नाही.

अंजुषा चव्हाण (विसपुते) मुख्याध्यापिका, माध्यामिक विद्यामंदिर एरंडोल.

प्रत्येक यशा मागचा एक अदृश्य चेहरा स्री

प्रत्येक स्त्री ही आपले कुटुंब सुशिक्षित संस्कारित व सुरक्षित व्हावे यासाठी सातत्याने धडपडत असते. मात्र आजही स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे तो दृष्टिकोन बदलावा हेच स्त्री शक्तीचे मजबुतीकरण आहे. ती एक कुटुंब सांभाळून सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. एक स्त्री ही परिवाराचा मोठा आधार आहे. तिच्याविना कुटुंब अपूर्णच आहे. जर परिवाराने व समाजाने तिच्या पंखांमध्ये बळ भरले तर ती कुठेही कमी पडणार नाही यात काही शंकाच नाही. स्री ही सर्वगुण संपन्न आहे. तिच्या व्यक्तिमत्वात असणारी ही चैतन्याची मूर्ती आहे. ती कुटुंबाला मार्गस्थ करणारी नारायणी आहे. स्त्रीचा आदर करा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खरी गरज आहे ती स्त्रीकडे सन्मानाने पाहण्याची, तिच्या कर्तुत्वाला साथ देण्याची. आणि याची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासूनच व्हायला हवी. मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायदे असले तरी तसे न करण्याची मानसिकता तयार होणे गरजे आहे. याबाबत जागर व्हावा. कुटुंबातील प्रत्येकाने स्त्रियांविषयी आदर भाव वाढला तर येणारी भावी पिढी सुद्धा तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवेल असे मला वाटते.

दिपाली शिवाजी पाटील मु.पो.विरावली ता.यावल

आदिशक्तीच्या जागरातून वाईट प्रवृत्तीचा नाश करावा

नवरात्रोत्सवात आदीशक्तीचा जागर करून वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी जागर करावा. महिषासुराचा नाश करण्यासाठी अठरा भुजी रूप धारण केलेल्या आदीमाया महिषासुर मर्दिनीचा जागर करतांना सर्व पूजाविधी पावित्र्य व आनंदी आनंद प्रसन्न वातावरणात कुलाचार पाळून उत्सव साजरा केला जातो. यात नवरात्रीच्या नऊ दिवस जागर करीत सुख, शांती, समृद्धी व पशुपालकांचा जिवाभावाच्या पशुधनावर आलेल्या लंपी रोगाचा कायमचा नाश करून पशुधनासह पशुपालक, शेतकरी राजाला सुगीचे दिवस मिळू दे, म्हणून प्रार्थना करते. ग्रामिण भागात शेतकर्‍याची खरी देवता त्याची शेती आणि त्याची गुरे हीच असतात. यांच्या मतदीनेच तो सार्‍या जगाचा पोशिंदा बनतो. अन्नधान्याच्या राशी तयार करतो म्हणून या जगाची रहाटगाणे चालु राहते. कोरोना काळात सारे जग बंदावस्थेत असतांना केवळ एकच उद्योग सुरू होता तो म्हणजे शेती उद्योग. त्यामुळे शेतीला आता उद्योगाचा दर्जा मिळाला तर कृषीला चालना मिळेल. यासाठी आता सर्वानी जागर करावा. नवरात्रौत्सवात जगावरील ही संकटे दुरू करण्यासह माणसाला माणसात आणण्याबाबतचाही जागर करण्याची गरज आहे.

सीमा भागवत पाटील , माजी सरपंच-पाडळसरे ता अमळनेर

दोघांच्या प्रयत्नांनी निकोप समाज निमिर्ती

एकविसाव्या शतकामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये प्रगती घडून येत आहे. मात्र आजही ग्रामीण क्षेत्रांमध्ये स्त्रियांच्या स्थितीमध्ये फारशी सुधारणा दिसून येत नाही. आजही स्त्रियांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. या वास्तवाचा स्वीकार करून स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. शैक्षणिक पातळीवर, आरोग्य पातळीवर, मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत होणे आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे देखील आवश्यक आहे. ग्रामीण भागात मुलींना सक्तीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अगदी प्राथमिक शाळेपासूनच अभ्यासक्रमात स्त्रीविषयक नवा दृष्टीकोन समाविष्ट करणे आवश्यक आहे. खरे तर स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच हा नवा विचार कसा रुचेल हयाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. कारण पुरुषांनी नव्या भूमिकेचा स्वीकार केला तर आपोआपच स्त्रियांची परिस्थिती सुधारेल. दुखण्याचे मूळच मग नाहीसे होईल.खरे तर त्याचीच गरज आहे. ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचे प्रयत्न करताच सावित्रीबाई पुढे आल्या. पुरुषांनी समोर हात करताच स्त्री हातात हात देतेच. किमान हाताला हात तरी लावतेच. दोघांनी मिळून प्रयत्न केल्यास नवा निकोप समाज नक्कीच उदयास येईल.

हर्षा संदीप पाटील, सदस्य अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ

नारीशक्तीच अध्यात्माची मुर्ती.

गेली दोन वर्ष देशात कोरोना महामारी मुळे सणउत्सव साजरे झाले नाहीत. मात्र यावर्षी कोरोना लसीकरणा मुळे निर्बंध हटविले गेल्यानेे नवरात्र उत्सव आनंदात आणि उत्साहात सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्री शक्तीची उपासना नवरात्र म्हणजे स्री मध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर होय. नवरात्रीत मातेची भक्ती करण्यासह उपवासही महिला करतात. सर्व सणांमध्ये स्रीचे स्थान महत्वपुर्ण आहे व त्यानुसार महिलाही धार्मीक पद्धतीने जीवन जगतात व परीवारालाही तशी शिकवण देतात . म्हणून स्री हीच सुसंस्कारीक समाज घडवते व समाजाला दिशा देते. स्रीने केलेले अध्यात्म हे परीवार व देशाच्या संकटात वेळोवेळी कामी येते. नवरात्रीचा उत्सव साजरा करतांना महिलामध्ये उत्साह व आनंद असतो. महिलांना विविध क्षेत्रात कार्ये करण्यासाठी प्रोसाहीत करून त्यांचा सन्मान व आदर करावा. कारण स्रीशक्तीच अध्यात्माची खरी मुर्ती आहे. कळायला लागल्यापासून मुली अनेकविध धार्मिक व्रते करत असतात. ती मरेपर्यत कायम ठेवत असतात.त्यामुळे घरात एक धार्मिक वातावरण तयार होऊन वाईट प्रवृत्तींचा नाश होत असतो. त्यामुळे एक चांगला व सुसंस्कारीत समाजाची निर्मिती होत असते. म्हणून अंधश्रध्दा म्हणून नव्हे तर श्रध्दा म्हणून हे हवेच.

सौ.भावना शशीकांत पाटील. उप सरपंच उंटावद ता.यावल.

स्त्री जन्माचा गर्व बाळगा

आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. आई, माता, जननी अशी अनेक विशेषण तिला लावली जातात, म्हणून मिळालेल्या या स्त्री जन्माचा आपण गर्व करायला हवा. कारण एकाहून अधिक भूमिका निभावणारी स्त्री ही एकमेव व्यक्ती आहे. मुलगी, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून, सासू अशा अनेक भूमिकेत ती जगत असल्याने माझ्या दृष्टीने स्त्री जन्म म्हणजे एका कलाकाराचा जन्म आहे. भारतात नामवंत लेखिका, कलाकार, गायिका, तत्वज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया पुष्कळ आहेत. धरतीपासून आसमंतापर्यंत तिची झेप पुढेच जात आहे. त्यामुळे स्त्री म्हणजे आपल्या समाजातील चैतन्यमय घटक आहे, हे सिध्द झाले आहे.अशा स्थितीमध्ये तिच्या भाव-भावनांचा, विचार-हक्कांचा आणि कर्तबगारीचा कोंडमारा करणे इष्ट ठरणार नाही, कारण ती आता अबला राहिली नसून सबला आहे. म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त सांगावेसे वाटते की, साक्षर महिलाच प्रगत समाज घडवू शकतात. कारण एक महिला शिकली तर सारं कुटूंब शिकते. एक कुटूंब शिकले तर एक समाज शिक्षित होतो आणि समाज शिक्षित झाला तर देश साक्षर होतादेश साक्षर झाला तर प्रगतीच्या वाटा खुल्या होतात. आपल्यावरील अन्यायायाला वाचा फोडण्याची आत्मीक क्षमता येत असते. ही आत्मीक क्षमता महिलांना आयुष्यात येणार्‍या विविध अडचणींना सामोरे जाण्यास बळ देते.

अर्चना प्रशांत नाईक, जळगाव

अपंगांचा सन्मान करा…

भारतीय समाजात अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही वेगळाच दिसतो. त्यांना हिणवत त्यांच्याकडे बघून विनोद केला जातो. परंतु त्यांच्यातही अनेक कलावंत लपलेेले असतात. समाजाच्या या प्रवृत्तीमुळे ते त्यांचे कलागुण प्रकट करू शकत नाही. शेवटी ती देखील माणसे असतात याचा समाजाला विचार करायला हवा. त्यांचा समाजाने सन्मान करायला हवा. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे जेणेकरून ते आपल्यातील अपंगत्व विसरून नवीन वाटचालीस सुरुवात करतील. अपंगत्व हे स्वतःहून ओढवून घेतलेले नसते तर ते नैसर्गिक असते त्या व्यक्तीचा त्यात दोष नसतो.

या अपंग घटकातील मी देखील एक अपंग असलेली महिला अंगणवाडी सेविका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी माझे कार्य अतिशय तन-मन-धनाने करून समाज उभारणीच्या कार्यात मदतच करीत आहे. मलाही सामाजिक जीवनात अनेक कटू असे अनुभव आले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मी या शैक्षणिक कार्यात स्वतःला गुरफटून घेतले. शासनाने आमच्यासारख्या अपंगांकडे विशेष लक्ष द्यावे. पेन्शन योजना, तसेच निमशासकीय मधून शासकीय योजनांचा अंगणवाडी सेविकांना फायदा व्हावा जेणेकरून आमच्यासारख्या अपंगांना जीवन जगण्यासाठी बळ मिळेल ,याचा शासनाने विचार करावा ही विनंती.

सगुना रामचंद्र हिवाळे. अंगणवाडी सेविका तळेगाव ता. जामनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या