Saturday, April 27, 2024
Homeनगरनवोदयसाठी जिल्ह्यातील 69 केंद्रांवर शनिवारी परीक्षा

नवोदयसाठी जिल्ह्यातील 69 केंद्रांवर शनिवारी परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी शनिवार, 30 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11 ते 1.30 यावेळेत जिल्ह्यातील 69 केंद्रांवर परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी यंदा विक्रमी 16 हजार 89 अर्ज प्राप्त झाले आहेत. परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने 69 केंद्र संचालक व 69 केंद्र निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय या सीबीएसई बोर्डाच्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ही प्रक्रिया राबवली जाते. सध्या पाचवीत शिकत असलेला कोणत्याही शाळेतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. परीक्षेच्या गुणवत्ता यादीतून केवळ 80 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यालयात पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण व वसतिगृहाची सोय मिळते.

दरम्यान, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 16 हजार 89 अर्ज प्राप्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील 69 केंद्रांवर ही परीक्षा होत असून नुकतेच माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर विद्यालयात या परीक्षेसाठी नियुक्त केंद्र संचालक व केंद्र निरीक्षक यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यात परीक्षेच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनासाठी या विद्यालयात पुढील बारावीपर्यंत शिक्षण व वसतिगृहाची सोय मिळते. आपला पाल्य या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकही प्रयत्नशील असतात. गेल्या दोन वर्षांपासून करोना काळ असल्याने या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी मुकले होते. करोनानंतर यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून 16 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातून 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

नवोदयच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन वर्षे करोनाचा काळ गेल्यानंतर मुले उत्साहात ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेच्या निमित्ताने मुलांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव येतो. मेरीटमधील मुलांची पुढील शिक्षणासाठी निवड होते.

– अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

- Advertisment -

ताज्या बातम्या