Friday, April 26, 2024
Homeनगरसातव्या माळेला मोहटादेवी चरणी दहा लाख भाविक

सातव्या माळेला मोहटादेवी चरणी दहा लाख भाविक

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

श्री क्षेत्र मोहटादवी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सातव्या माळेला राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या सुमारे दहा लाख भाविकांनी मोहटादेवी दर्शनाचा लाभ घेतला. मोहटादेवीकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने पायी चालणार्‍या भाविकांची अहोरात्र रिघ सुरू आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खा. डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे यांच्यासह विविध मान्यवरांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले.

- Advertisement -

मोहटादेवीला दर्शनासाठी येणार्‍या ाविकांची गर्दी पाचव्या माळेपासून वाढत असून गर्दीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडून उच्चांक केला. लाखो भाविक देवीचा जयघोष, भजने, ओव्या गात तल्लीन होऊन पायी चालत होते. देवीभक्तांना रस्त्यावर ठिकठिकाणी अल्पोपहार, नाश्ता, साबुदाणा खिचडी, पोहे, चहा पिण्याचे पाणी मोफत पुरविण्यात आले. पाथर्डी शहरात ठिकठिकाणी एका दिवसात दहा टन साबुदाणा खिचडीचे प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आले. पाथर्डी व शेवगाव तालुका केमिस्ट असोसिएशन, व्यापारी मंडळ, दैनिक बचत कर्मचारी संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावतीने मोफत प्रसाद वाटप व औषध वितरण स्टॉल लावण्यात आले गेले. चोवीस तासात सुमारे चार लाख भाविकांनी पायी चालत येऊन दर्शन घेतले सुमारे चाळीस ट्रक पाणी बॉटल विविध विक्रेत्यांनी विकल्या. याशिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे जार लोकांनी भक्तांसाठी रस्त्यावर मांडून ठेवले होते. सध्या पाथर्डी शहरासह संपुर्ण तालुका नवरात्रमय झाला असून उद्या सायंकाळी अष्टमी होम हवनाने व्रताची सांगता होईल.

खा. डॉ. सुजय विखे यांनी मोठी गर्दी पाहून भावीकांबरोबर पायी चालत संवाद साधला. त्यांनी स्वतः गर्दीत थांबून सेल्फी घेतले. त्यांनी देवस्थान समिती व स्थानिक प्रशासनाबरोबर यात्रेसंबंधी चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, अ‍ॅड. प्रतीक खेडकर, बंडु बोरूडे, संजय बडे, दत्ता बडे, विजय कापरे आदी उपस्थित होते. भाविकांच्या प्रचंड संख्येमुळे पोलीस बंदोबस्त कमी पडल्याने वाहतूक कोंडी वारंवार झाल्याने भाविक वाहतूक नियंत्रण करत वाहतूक सुरळीत करीत होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सपत्नीक मोहटादेवीचे दर्शन घेऊन महापूजा केली. रात्री उशिरापर्यंत तिसगाव, पाथर्डी मोहटा व शेवगावकडून व बीड कडून येणारे रस्ते पूर्णपणे वाहतूक कोंडीत सापडले होते. पाथर्डी शहरातील प्रत्येक गल्लीबोळातून पायी चालत भाविकांनी मोहटा देवीचा रस्ता शोधत मंदिर गाठले.

अभुतपूर्व वाहतूक कोंडी

पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवस्थानच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कधीच झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ऐन नवरात्र काळात मुख्य रस्त्यावर पुलाचे काम सुरू करून पर्यायी रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी वाढली. यामुळे पोलीस व वाहतूक यंत्रणा हतबल झाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्याने त्यांचा ताफा सांभाळत पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या