Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनवापूर पालिकेच्या अधिकार्‍यांना नागरिकांकडून बांगड्यांचा आहेर

नवापूर पालिकेच्या अधिकार्‍यांना नागरिकांकडून बांगड्यांचा आहेर

नवापूर – Navapur – श.प्र :

नवापूर नगर परिषद हद्दीत सुरु असलेल्या कुंभारवाडा येथे कारपेट रोडचे सुरु असलेले काम तात्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करत प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना बांगडयाचा आहेर दिला.

- Advertisement -

याबाबत तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता नवापूर नगरपालिकेजवळ भारतीय जनता पार्टीचे पदधिकारी व कुंभारवाडा भागातील रहीवासी यांनी नवापूर नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले व अधिकार्‍यांना बांगडयाचा आहेर देत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 6 कुंभारवाडा येथील रहिवासी व नागरिक कुंभारवाडा ते नवनीत पंचाल यांच्या घरापर्यंत कारपेट रस्त्याचे काम नगरपरिषदेमार्फत सुरु आहे.

सदर ठिकाणी 20 वर्षांपुर्वीची असलेली गटार लाईन पुर्ववत सुस्थितीत सुरु करण्याकामी नवीन गटारलाईन करण्याबाबत यापुर्वी देखील कळविण्यात आले होते परंतु, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष करुन या ठिकाणी कारपेट रोडचे काम सुरु केलेले असून नागरिकांचा त्यास विरोध आहे.

सदर गटार लाईन तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे.आर्थिक वर्ष 1995 पासून सदर रस्त्याचे काम सुरु असून त्यामुळे रस्त्याची उंचीही वाढली असून यामुळे नागरिकांच्या घराच्या पायर्‍या देखील या रस्त्यामुळे दाबल्या गेलेल्या आहेत.

सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात रस्त्याची उंची ही वाढली असून रस्ता पुर्ण खोदून पुनश्च बनविल्यास नागरिकांना व रहिवाशांना सोयीचे होणार आहे.

आता सदर रस्त्याचे काम सुरु झाले व रस्ता पुर्णत्त्वास आल्यास रस्त्याच्या उंचीमुळे तसेच गटार लाईन ही लहान असल्याने पाणी बाहेर तुंबेल व रहिवाशांच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या रस्त्याचे खोदकाम करुन रस्त्याची उंची ही अर्धा फुट करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर निलेश प्रजापत, गुलाम आमलीवाला, जयेश प्रजापत, विनोद प्रजापत, रामू प्रजापत, सुरेश प्रजापत आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या