Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारदोन बिबटयांची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस

दोन बिबटयांची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस

नवापूर Navapur – श.प्र :

तालुक्यातील चिंचपाड्याच्या वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

विषप्रयोग करुन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या दोन्ही बिबट्यांचे दात,मिश्या व चारही पंजे ही कापून त्यांना जमिनीत पुरण्यात आले होते. या बिबटयांना बाहेर काढून वनविभागाने अंत्यसंस्कार केले.

तालुक्यातील गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यांनी अनेक गुरे, पशुधन फस्त केले होते. त्यामुळे लोकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्या अनुषंगाने काही लोकांनी मेलेल्या पशुच्या मांसमध्ये विषारी औषध टाकून त्यांना मारुन टाकल्याचे समजते. दरम्यान, एक सात वर्षीय बिबट्याला मारुन 15 दिवसापुर्वी जमीनीत पुरण्यात आले होते. त्याला रविवारी बाहेर काढले असता कुजलेल्या अवस्थेत त्याचा सांगाडा मिळून आला.

त्यावर रविवारी पंचनामा करून अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रकरणी वनविभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता.

त्यांनी दुसर्‍या बिबट्यालाहीजमीन पुरले असल्याची माहिती समोर आली. त्या बिबट्याचे चारही पंजे तोडलेले दिसून आले.

वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मृत बिबटयाला बाहेर काढून त्याचा पशुधन व महसूल कर्मचार्‍यांच्या समक्ष पंचनामा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसराही बिबट्या मारण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

या मयत बिबटयांचा मृत्यू नैसर्गिक झाला की शिकाराने हे अद्याप कळू शकलेले नाही, शवविच्छेदन अहवाल आल्यावरच त्याची माहिती मिळेल असे वनअधिकारी आर.बी.पवार यांनी सांगितले. यासंदर्भात काल सहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

उप वनसंरक्षक सुरेश कवटे, सहाय्यक वनसंरक्षक डी.जी.पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर.बी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ.योगेश गावित, मंडळधिकारी बी.एन.सोनवणे, तलाठी जी.एस.तडवी, नवापूर चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वनविभागाचे 50 हून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल होते. वन विभागाची जंगलात शोध मोहीम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या