Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारलाच स्विकारतांना नवापूर येथील कंत्राटी व्यवस्थापकास अटक

लाच स्विकारतांना नवापूर येथील कंत्राटी व्यवस्थापकास अटक

नवापूर – Navapur – श.प्र :

मोफत बी-बियाणे योजनेचा लाभ रब्बी हंगामातही सुरु ठेवण्यासाठी शेतकर्‍यांकडून 8 हजार 750 रुपयांची लाच स्विकारतांना

- Advertisement -

तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील आत्मा प्रकल्पात कार्यरत असलेल्या कंत्राटी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून यांच्या शेतकरी गटासाठी शासनामार्फत मोफत बी बियाणे व खते देण्याची योजना आहे. त्यासाठी शेतकरी एकत्र येऊन गट स्थापन करून कायदेशीर रजिस्ट्रेशन करून त्याची यादी शेतकरी उत्पादक कंपनी यांना सादर करून कंपनीमार्फत जिल्हा पातळीवर तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे सदर बी बियाणे निविष्टा यांची मागणी करतात. संबंधित कार्यालयाकडून तालुका पातळीवर आत्मा प्रकल्प कार्यालयाकडे वाटपासाठी पाठवले जाते. त्याप्रमाणे नमूद गटात असलेल्या यादीतील लोकांना सदर बी बियाणे निविष्टा यांचे मोफत वाटप केले जाते.

याप्रमाणे यातील तक्रारदारांनी समृद्धी शेती उत्पादक गट पिंपराण पोस्ट पोटीबेडकी ता.नवापूर असा एकूण 16 शेतकर्‍यांचा गट कायदेशीर स्थापन करून रजिस्टर केला. तक्रारदार हे नमुद गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गटास बी बियाणे निविष्टा शासनाकडून मोफत वाटप झालेले आहे व शेतात पेरणी देखील झाली आहे.

नवापूर येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयांतर्गत आत्मा प्रकल्प कार्यालयातील कंत्राटी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लोकसेवक योगेश वामनराव भामरे याने 7 दिवसांपूर्वी तक्रारदाराकडे सर्व 16 शेतकर्‍यांचे प्रत्येकी 250 प्रमाणे 4 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच न दिल्यास पुढील रब्बी हंगामातील पिकांचे बी बियाणे मोफत मिळू देणार नाही असे सांगितले.

तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर दि.19 ऑक्टोबर 2020 पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक तक्रारदारांना 16 शेतकरी नसून 35 शेतकरी आहेत असे सांगून प्रत्येकी 250 प्रमाणे एकूण 8 हजार 750 लाचेची मागणी करून ती लाच पंच व साक्षीदारांसमक्ष नवापूर स्टेट बँक ऑफ इंडिया रोड वरील सार्वजनिक रस्त्यावर स्विकारली म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरिष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, हेकॉ उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, पोलीस नाईक दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या