Thursday, April 25, 2024
Homeनगरमहामार्ग 51 च्या नाऊर-हरेगाव रस्त्याचे उर्वरित काम होणार कधी?

महामार्ग 51 च्या नाऊर-हरेगाव रस्त्याचे उर्वरित काम होणार कधी?

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातून जाणार्‍या महामार्ग 51 वरील हरेगाव फाटा-उंदिरगाव-नाऊर रस्त्याचे बर्‍याच अंशी काम करण्यात आले. मात्र उंदिरगाव-नाऊर या रस्त्याचे उर्वरित 3 ते 4 कि. मी.चे काम अद्याप शिल्लक आहे. या रस्त्याचे काम त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांसह दैनंदिन ये-जा करणार्‍या प्रवासी व नागरिकांमधून होत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर व वैजापूर दोन तालुक्यांना जोडणारा तसेच औरंगाबाद-नगर या दोन्ही जिल्ह्यांना आर्थिकदृष्ट्या विकसित करण्याच्या हेतूने तत्कालिन मंत्री अशोक पाटील डोणगावकर व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या पाठपुराव्याने तर दैनिक सार्वमतचे संपादक स्व. वसंतराव देशमुख यांच्या दुरदृष्टीतून श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून गोदावरी नदीवर पुल बांधण्यात आला. या पुलावरून जाण्यासाठी अनेक वर्ष पूर्वीचा राजमार्ग क्र. 47 तर नव्याने महामार्ग 51 रस्त्याच्या प्रतिक्षेत होता. आ. लहु कानडे यांच्या प्रयत्नातून हरेगाव फाटा-उंदिरगाव-नाऊर रस्त्याचे बर्‍याच अंशी काम करण्यात आले. मात्र उंदिरगाव-नाऊर रस्त्याचे उर्वरित 3 ते 4 कि.मी.चे काम शिल्लक आहे.

प्रवरासंगमच्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी तसेच श्रीरामपूर वैजापूर या दोन्ही शहरांना जवळून जोडण्याच्या हेतुने नाऊर येथे पुल बांधण्यात आला, अनेक वर्ष हा पुल रस्त्याची वाट पाहत होता. या भागातील शेतकर्‍यांना भुसंपादनाची रक्कम न मिळाल्याने रस्ता होऊ न देण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले होते. मात्र तत्कालिन राजकारणी मंडळी व अधिकारी यांनी पुढाकार घेत अनेक अडचणीवर मात करून हा रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर अनेकदा हा रस्ता पुराच्या पाण्यात वाहुन गेला. मात्र अधिकांर्‍यांच्या डोळेझाकपणामुळे हा रस्ता शेवटच्या घटका मोजत होता.

आ. कानडे यांच्या पाठपुराव्यामुळे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाचा नुकतेच शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याचे काम करण्यात आले असले तरी विजेचे खांब रस्त्यालगत असल्यामुळे की आणखी काही कारणास्तव उर्वरित 3 ते 4 कि. मी. रस्त्याचे काम अद्यापी शिल्लक आहे. वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरणारे तसेच जि. प. सदस्य पकंज ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने वैजापूरच्या बाजुनेही रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र वाळूच्या ओव्हरलोड वाहनांमुळे वैजापूरकडील रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

दरम्यान, निमगांव खैरी ते नाऊर रस्त्याचे 1 ते दीड कि. मी. काम बाकी असुन या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी, रुग्ण, अबाल वृद्ध यांची मोठी हेळसांड होत असते.

यासंदर्भात आ. कानडे यांना शिष्टमंडळ भेटले असता त्यांनी संबधित अधिकारी यांना तत्परतेने या रस्ताची दुरुस्ती करण्याची सूचना केली होती. मात्र अद्याप या रस्त्याविषयी अधिकार्‍यांनी तत्परता दाखवली नाही. त्यामुळे आ. कानडे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या