Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यानयनरम्य निसर्ग पाहून देवी इगतपुरी घाटातच थांबली

नयनरम्य निसर्ग पाहून देवी इगतपुरी घाटातच थांबली

इगतपुरी । वाल्मिक गवांदे

श्रीदुर्गा सप्तशतीमधील प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी या सुप्रसिद्ध श्लोकातली पहिली शैलपुत्री देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत आहे. हे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी म्हणतात.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते. त्यावेळी खुद्द त्यांनी घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून दर्शन घेतले असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. भगवती शैलपुत्री ही दुर्गेच्या नऊ रूपांतील प्रथम रूप आहे. पर्वतराज हिमालयाची ही कन्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे.

आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी शैलपुत्री

देवी उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमलपुष्प धारण करते. शैलम म्हणजे पर्वत, पर्वतात माणिक, रत्ने व इतर मौल्यवान प्रकारचा साठा उपलब्ध आहे. हा मौल्यवान साठा सहज उपलब्ध असूनही भौतिक सुखाकडे आकर्षित न होता त्याचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी ही शैलपुत्री घाटनदेवी आहे.

देवीची मूर्ती संगमरवरी

मंदिरात घाटनदेवीची अतिशय प्रसन्न व सुबक मूर्ती आहे. देवीची ही मूर्ती संगमरवरी आहे. देवी सिंहावर बसलेली आहे. शैलपुत्री अष्टभुजांची असून, तिच्या प्रत्येक हातात आयुध आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप आजही भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण आहे.

गावकऱ्यांची अशी आहे श्रद्धा

सिंहावर आरूढ झालेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. म्हणूनच मंदिराच्या आसपास आजवर कुठलाही आघात किंवा अपघात झाला नाही आणि गावावरही विशेष संकट आले नाही, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

असे पडले घाटनदेवी नाव

शेंदूरचर्चित असलेली घाटनदेवीची जुनी मूर्ती म्हणजे तांदळा नवीन मंदिरातही तसाच अचल स्वरूपात पूर्वीच्याच ठिकाणी जसाच्या तसा ठेवलेला आहे. घाटमाथ्यावर मंदिर या देवीचे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी संबोधले जाते.

सुंदर व नयनरम्य निसर्ग

शैलाधिराज तनया असलेली ही तेजस्वी देवी वज्रेश्वरीहून निघाली असता रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली. इथला सुंदर व नयनरम्य निसर्ग पाहून ती येथेच कायमची स्थिर झाली असे म्हणतात. मुंबईहून येताना कसारा मार्गाने घाटमाथ्यावर आल्याबरोबर थळघाटाच्या तोंडाशीच असलेल्या घाटनदेवीचे दर्शन घेऊनच नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी परिसरांत प्रवेश केला जातो.

शिवाजी महाराजांनी केली पुजा

श्रीदुर्गा-सप्तशती या ग्रंथात घाटनदेवीचा उल्लेख सापडतो तो ‘शैलपुत्री’ या नावाने. मंदिरासमोर उंटदरी नावाचे ऐतिहासिक स्थान आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा नदीचा उगम याच उंटदरीत झाला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह घाटनदेवीची यथासंग व शास्रोक्त पूजा करून दर्शन घेतल्याची ऐतिहासिक नोंद आहे.कल्याणचा खजिना लुटून या दरीत उंट लोटले म्हणून या दरीला उंटदरी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

नवरात्रात मोठा उत्सव

उंटदरी नावाचे सृष्टिसौंदर्याने नटलेले निसर्गरम्य ऐतिहासिक स्थान घाटनदेवी मंदिराजवळच आहे. १९७३-७४ मध्ये या मंदिराची उभारणी झाली. या दोन्ही ठिकाणी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. पहाटे पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी असते. महानवमी व विजयादशमीला गर्दीचा उच्चांक गाठला जातो.

पितळी घंटेचा नवस

नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही देवीच्या मंदिरात पाहायला न मिळणारे वेगळेपण इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरात पाहायला मिळते. ते म्हणजे या मंदिरात पितळेच्या लहान-मोठ्या अनेक घंटा जागोजागी बांधलेल्या दिसतात. स्त्री-पुरुष भाविक देवीला नवस करताना ‘ माझी अमुक इच्छा सफल होऊ दे, म्हणजे मी देवीला पितळी घंटा वाहीन ‘ असा नवस करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते असा विश्वास भाविकांमध्ये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या