Wednesday, May 8, 2024
Homeनगरदेशी गाईला गीर जातीचे भ्रृण प्रत्यारोपण

देशी गाईला गीर जातीचे भ्रृण प्रत्यारोपण

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पहिल्यांदाच गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे.

- Advertisement -

हा प्रकल्प पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत असून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते दि.28 ऑक्टोबर 2021 मध्ये या प्रगत तंत्रज्ञान वापराचा शुभारंभ करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून गो-संशोधन व विकास प्रकल्प, राहुरी येथे झाला. कालवडीचे वजन 22.9 किलो असून पिता विष्णू या वळूमातेचे दूध 4165 लि. आहे व फॅट 5 टक्के एवढी आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकरांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. हे तंत्रज्ञान एनडीडीबी राहुरी यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या वाढविण्यासाठी, संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या तंत्रज्ञानाबद्दल म्हणाले, सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादनक्षमता असणार्‍या गाईंची संख्या वाढविण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाशिवाय तरणोपाय नाही, असे सांगितले व सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले.

संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. कांबळे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कनखरे, विभाग प्रमुख, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. सुनील अडांगळे तसेच एनडीडीबीचे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत.

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलित अंडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्चदर्जाचे वासरू मिळविणे.

देशामध्ये देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण असून या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्‍यांच्या दारापर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी 75 टक्के गाई गावठी स्वरूपात आढळत असून फक्त 25 टक्के गाई शुद्ध स्वरूपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्चदर्जाच्या जलदगतीने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल.

– कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या