Friday, April 26, 2024
Homeनाशिकराष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना दिलासा द्यावा

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना दिलासा द्यावा

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जास्तीत जास्त कर्जवाटप करून नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा,असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटप आणि इतर मुद्द्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यभरात चांगला नावलौकिक असलेली बँक होती. बँकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेपोटी जिल्हा बँकेला 920 कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त 231.51 कोटी पिक कर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वारंवार येणार्‍या तक्रारी लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जे शासनाने आखुन दिलेले आहे त्याप्रमाणे त्यांनी ते पुर्ण करावे आणि इतर कर्जपुरवठा हा राष्ट्रीयकृत बँकांच्या मदतीने करावा. या माध्यमातून शेतकर्‍यांना मात्र कर्ज पुरवठा झालाच पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक देशमुख, नाशिक बँकेचे प्रशासक अन्सारी, सहकारी संस्था सहनिबंधक ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या