विरोधकांच्या आरोपांना राष्ट्रीय वयोश्री योजना हेच उत्तर- आमदार विखे

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नाही या विरोधकांच्या आरोपाला राष्ट्रीय वयोश्री योजना हेच उत्तर असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. केंद्राच्या योजना सर्वांसाठीच असल्याने राज्यातील सताधारी पक्षातील ज्येष्ठांनाही फायदा घेण्यास हरकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संगमनेर येथील मालपाणी विद्यालयात राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील सहाव्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे औपचारिक उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, उत्तर नगर जिल्हयाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिबिराच्या संदर्भात आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राज्यातील मंत्री केंद्राकडे बोट दाखवून नेहमीच टिका करतात. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील सामान्य माणसासाठी योजना नुसत्या जाहीर केल्या नाहीत तर त्याची अंमलबजावणी केली. मोफत धान्यापासून ते मोफत लसीकरण केंद्र सरकारने केले. राज्याचे मुख्यमंत्री फक्त सहा हजार कोटीचा धनादेश तयार असल्याचे सांगत होते. पण त्यांचा तो धनादेश कुठे गेला असा सवाल करुन आ. विखे पाटील म्हणाले की, वयोश्री योजना ही देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करून त्यांना आधार दिला. जिल्ह्यात या योजनेची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले.

शासानाच्या योजनेची अंमलबजावणी करताना पक्षपात नसतो त्यामुळे सर्वासाठी या योजनेची सुरूवात केली आहे. संगमनेर तालुक्यात मिळालेला प्रतिसाद पाहाता या तालुक्यात फक्त मूठभर लोकांसाठी योजना राबविल्या जातात. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता गावागावातील प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरीकांपर्यंत पोहचल्यानेच मोदीजींच्या योजनेचा लाभ या ज्येष्ठ नागरीकांना मिळवून देता आल्याचे समाधान आ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

खा. सुजय विखे पाटील यांनीही राज्यातील मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे सुरू असलेले काम या शिबीरात येवून पाहावे असे आवाहन माध्यमांशी बोलतांना दिले.

संपूर्ण शिबीरात ज्येष्ठ नागरीकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील सर्वच भागातील नागरीकांनी उत्स्फूर्तपणे येवून आधार साहीत्याची नोंदणी केली. आलेल्या सर्व ज्येष्ठांना आ. विखे पाटील मार्गदर्शन करून आस्थेने चौकशी करीत होते. या शिबीरात कान, डोळे, दात यासाठी लागणार्‍या साहीत्याची मागणी नोंदणीकरीता मोठी गर्दी होती. या सर्व नागरीकांना डॉ. सुजय विखे पाटील मार्गदर्शन करीत होते. शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी भेटी देवून या उपक्रमाचे कौतुक केले. सांयकाळी उशिरापर्यंत ही नोंदणी सुरू होती. साडेतीन हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरीकांनी आधार साहीत्यासाठी नोंदणी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *