Thursday, April 25, 2024
Homeनगरराष्ट्रीय पशुधन अभियानात सहभाग घ्या

राष्ट्रीय पशुधन अभियानात सहभाग घ्या

वीरगाव|वार्ताहर| Virgav

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास अभियानासाठी अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वारंवार करुनही शेतकर्‍यांनी अद्यापपर्यंत अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून शेळी-मेंढी, वराह आणि कुक्कुट पालनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असून या योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे, एका छताखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन, वैरणीची उपलब्धता वाढविणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, नाविन्यपूर्ण उद्योगास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. 2025 पर्यंत सुरू राहणार्‍या या योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन अकोले तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक धिंदळे यांनी केले. अकोले तालुक्यात आतापर्यंत शेळीपालनासाठी 8 प्रकरणे झाल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी-मेंढी पालनासाठी 100 मादी आणि 5 नर या युनिटसाठी 10 लाख रुपये तर 500 मादी आणि 25 नर या युनिटसाठी 50 लाखांचे अनुदान दिले जाते. होणार्‍या एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदानाची हमी केंद्राकडून मिळते. वराह पालनाच्या 50 मादी आणि 5 नर त्याचप्रमाणे 100 मादी आणि 10 नर या युनिटसाठी अनुक्रमे 15 ते 30 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. मुरघास बेल, वैरणीच्या विटा आणि टीएमआर निर्मितीसाठीही 50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शेतीमालाच्या अशाश्वत बाजारभावामुळे शेतीपूरक व्यवसाय वाढविण्याची गरज निर्माण झाली असून शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. यासाठी इच्छुक शेतकर्‍यांनी अकोले तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.धिंदळे यांनी केले आहे.

शेळीपालन हा व्यवसाय शेतकर्‍यांच्यादृष्टीने अधिकाधिक फायद्याचा आहे. गो-पालनाच्या तुलनेत कमी खर्चाचा आणि अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय ठरतो. मनुष्यबळही कमी लागते. दूध उत्पादन हा उद्देश या व्यवसायात असला तरी मांस निर्मितीसाठी अधिक उत्पादन यातून शेतकर्‍यांना मिळेल. मांस खाणारांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे. शिवाय परदेशातही यांची निर्यात होते. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना शेळीपालन हा सर्वाधिक उत्पन्न देणारा शेतीपूरक व्यवसाय ठरणार आहे.

– डॉ.अशोक धिंदळे, पशुधन विकास अधिकारी,पं.स.अकोले.

- Advertisment -

ताज्या बातम्या