राज्य क्रॉसकंट्रीत नाशिक विजयी; वरिष्ठ गट, महिला गटात निर्विवाद वर्चस्व

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स असोसिएशनच्या अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आणि निवड चाचणी स्पर्धेत नाशिकच्या वरिष्ठगट व महिला गटांनी निर्विवाद वर्चस्व राखले. वरिष्ठ गटात नाशिकने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

पुणे जिल्ह्यातील पुलगाव येथे या स्पर्धा झाल्या. यात नाशिकच्या 16 वर्षे मुले- मुली, 18 वर्षे मुले- मुली, 20 वर्षे मुले-मुली आणि खुला गट पुरुष आणि महिला या चार गटांत नाशिकच्या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या नाशिकच्या खेळाडूंनी वरिष्ठ गटामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हीही गटात निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पुरुषामध्ये नाशिकच्या खेळाडूंनी पहिल्या चार क्रमांकावर आपले नाव कोरले तर महिला गटातही नाशिकच्या खेळाडूंनी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून या गटातही वर्चस्व प्रस्थापित केले.

पुरुष गटात नाशिकच्याच खेळाडूंमध्ये चुरस दिसून आली. यामध्ये दिनेश प्रसादने 33 मिनिट. 40 सेकंदामध्ये हे आंतर पार करून विजेतेपदावर आपले नांव कोरले. नाशिकच्या आदेश कुमारनेही 33. 40 या वेळेतच आपली धाव पूर्ण केली परंतु काही फ्रॅक्शन सेकंदाच्या फरकाने त्याला दुसरा क्रमांकावर समाधान मानावे लागले. नाशिकच्या सुमीत गोरेने 34.02 वेळेत तिसरा क्रमांक तर उपेंद्र बलियनने 34.42 वेळेत हे अंतर पूर्ण करून चवथा क्रमांक मिळविला.

नाशिकच्या कांतीलाल कुंभारनेही चांगली वेळ नोंदवत सातवा क्रमांक मिळविला. महिलांमध्येही नाशिकच्या आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू मोनिका आथरे आणि कोमल जगदाळे यां दोघीमध्येच चुरस दिसूनआली. यामध्ये कोमल जगदळेने अंतिम क्षणी वेगाने धाव घेऊन महिला गटात 38.06 अशी वेळ नोंदवत पहिल्या क्रमांकावर आपली मोहर उमटवली.

तर अनुभवी मोनिका आथरेने आपली धाव 39. 21,या वेळेत पूर्ण करून दुसरा क्रमांक निश्चित केला. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले तिसरा तर सातारच्या रेश्मा कवठेने चवथा क्रमांक मिळविला. नाशिकच्या धावपटूंच्या या दमदार कामगिरी मुळे नाशिक जिल्ह्याला या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विविध गटांसाठी महाराष्ट्राच्या संघांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा 19 फेब्रुवारी रोजी चंदीगड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

स्पर्धाच अंतिम निकाल

खुला गट पुरुष 10 किलोमीटर

1) प्रथम क्रमांक – दिनेश प्रसाद (नाशिक)

2) दुसरा क्रमांक – आदेश कुमार – (नाशिक)

3) तृतीय क्रमांक – सुमीत गोरे- (नाशिक)

4) चर्तुथक्रमांक – उपेंद्र बलियन (नाशिक)

5) पाचवा क्रमांक – रोहित यादव (मुंबई)

6) सहावा क्रमांक – अरुण राठोड (सातारा)

खुला गट महिला 10 किलोमीटर

1) प्रथम क्रमांक – कोमल जगदाळे (नाशिक)

2) दुसरा क्रमांक – मोनिका आथरे (नाशिक)

3) तृतीय क्रमांक – प्राजक्ता गोडबोले (नागपूर)

4) चर्तुथक्रमांक – रेश्मा कवठे (सातारा )

5) पाचवा क्रमांक – प्राची गोडबोले (नागपूर)

6) सहावा क्रमांक – प्राजक्ता पाईकराव (ठाणे)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *