Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedराष्ट्रीयत्व, आधुनिकता व विद्यार्थी हित जपणारे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ

राष्ट्रीयत्व, आधुनिकता व विद्यार्थी हित जपणारे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही संस्था १ मे २०२३ रोजी १०५ वर्षे पूर्ण करीत असून १ मे हा संस्थेचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…

स्वातंत्र्याच्या उर्मीने प्रेरित होऊन, लोकमान्य टिळकांच्या देशोद्धाराच्या विचारांनी भारावलेल्या नाशिकमधील तरुणांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये कै. शि. रा. कळवणकर, गुरुवर्य कै. रं. कृ. यार्दी, कै. ल. पां. सोमण, कै. शि. अ. अध्यापक व कै. वा. वि. पाराशरे या ध्येयवादी तरुणांनी (दि.१ मे १९१८) ह्या दिवशी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या नावाने शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात शाळा सुरु केली. त्याच वेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली.

- Advertisement -

सुरुवातीला १ ली ते ५ वी पर्यंतचे वर्ग होते. विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने १९१९ साली शाळा शिंदेकर यांच्या वाड्यात, तर १९२० साली राजेबहाद्दूर यांचे वाड्यात स्थलांतरित झाली. १९२४ मध्ये श्रीमंत माधवराव देशपांडे ह्यांच्या उदार देणगीमुळे शाळेसाठी जागा खरेदी केली व या जागेवर १९३२ रोजी १४ खोल्यांची इमारत बांधली. यासाठी ‘वाडिया ट्रस्ट’ आणि ‘सुरगाणा संस्थान’ यांचेकडून साहाय्य मिळालेले होते. १९३८ मध्ये शाळेसाठी भव्य व नवीन इमारत बांधली गेली. या नूतन इमारतीचे उद्घाटन जी.व्ही. मावळणकर यांच्या हस्ते झाले होते.

संस्थेने त्या काळात एक हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था केली होती. या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे मंडळावर आर्थिक जबादारी येऊन पडली होती. अशावेळी १९४३ मध्ये मुंबईचे व्यापारी विलासराय रुंगटा व गोविंदराय रुंगटा या बंधूंनी आपल्या वडीलांच्या नावाने उदार देणगी दिली. त्यामुळे मंडळ कर्जमुक्त होण्यास मदत झाली. जुलै १९४३ मध्ये न्यू इंग्लिश स्कूलचे “जुहारमल सरुपचंद रुंगटा हायस्कूल” असे नामकरण झाले. म्हणजेच सध्याचे जु. स. रुंगटा हायस्कूल होय. संस्थेची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्वांनाच प्रेरणादायी आहे. संस्थेबरोबरच जु. स. रुंगटा हायस्कूल या शाळेलाही १ मे रोजी १०५ वर्षे पूर्ण होत आहेत. आज १०५ वर्षानंतरही संस्था राष्ट्रीयत्वाचा, देशभक्तीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रम, व्याख्याने, प्रदर्शने, स्पर्धा यांच्या माध्यमातून रुजवित आहे.

“संहती: कार्यसाधिका” म्हणजेच ऐक्याने कार्य साधते. संस्थेच्या या ब्रीद वाक्या प्रमाणे संस्थेच्या स्थापनेपासून तर आतापावेतो होऊन गेलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, शाळा पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने व एकत्रित प्रयत्नाने संस्थेचा विस्तार नाशिक जिल्ह्यामध्ये शहर ते अतिग्रामीण भागापर्यंत झालेला आहे. आज संस्था प्रामुख्याने नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुलांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ५१ शैक्षणिक केंद्रांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अव्याहतपणे करीत आहे.

नुकतेच संस्थेने नाशिक व सिन्नर येथे कला, वाणिज्य महाविद्यालय सुरु केले आहे.संस्था कष्टकरी व नोकरीच्या निमित्ताने दिवसा शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी गेली ६८ वर्षे रात्र शाळा चालवित आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नाशिकरोड येथे संस्थेने रात्र महाविद्यालय सुरू केले आहे. काळाची गरज लक्षात घेऊन नाशिक व सिन्नर येथे संस्थेने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु केली आहेत. ही दोन्ही केंद्रे आत्मनिर्भर होण्यसाठी संस्था प्रयत्नशील आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिन्नर येथील आय.टी.आय च्या विद्यार्थ्यांनी शाळेला लागणारी बेंचेस तयार करून दिली आहेत.

संस्था गेली अनेक वर्ष विविध उपक्रम अव्याहतपणे राबवीत आहे. यामध्ये प्रामुख्याने गुरुवर्य कै. रं. कृ. यादी स्मृती व्याख्यानमाला, कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा, कै. खंडेराव लेले सूर्यनमस्कार स्पर्धा, कै.ल.पां सोमण वकृत्व स्पर्धा, कै. सौ. लक्ष्मीबाई लेले वकृत्व स्पर्धा, कै. सुमनताई बर्वे स्मृती व्याख्यान, क्रीडा महोत्सव, कृतज्ञता सोहळा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संस्कृती ज्ञान परीक्षा अशा विविध उपक्रमांचे सातत्याने व यशस्वी पूर्ण आयोजन संस्था करीत आहे. सर सी. व्ही. रमण अकादमीच्या माध्यमातून संस्थेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते.

संस्थेच्या व्ही.जे.हायस्कूल नांदगाव या शाळेचा विद्यार्थी वेदांत पोपटराव घुगे यास २०२१ मध्ये राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ( NTS) शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तर पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल नाशिकरोड या शाळेचा विद्यार्थी आर्य सोपान गलांडे (इ.६वी) यास चालू शैक्षणिक वर्षात डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत संपूर्ण राज्यातून निवड होऊन मेडल प्राप्त झाले आहे. तर इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थ्यांना तर ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ३४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश सर सी.व्ही. रमण अकॅडमीचे यश आहे असेच म्हणावे लागेल. तसेच संस्थेने २००६ पासून केंब्रिज विद्यापीठाची संलग्न असणारा फंक्शनल इंग्लिश कोर्स संस्थेच्या विविध शाळांमध्ये सुरू केला आहे.

संस्कारक्षम शिक्षणाबरोबर त्यात आधुनिकताही आणण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. नाशिकरोड येथील शाळांमध्ये ‘डिजीटल क्लासरूम’ तयार केले असून अन्य संकुलांमधेही असे क्लासरूमस् तयार केले जाणार आहेत. संस्थेची संगणक अकादमी कार्यरत असून, संस्थेच्या सर्व शाळा संस्था मुख्यालयाशी इंटरनेटनेट जोडलेल्या आहेत व संस्था डीजीटल कामकाजावर भर देत आहे. संगणक अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर ‘Computalent’ स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामध्ये जिल्यातून संस्थेच्या शाळांव्यतिरिक्त अन्य संस्थेतीलही हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसत असून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात ही स्पर्धा राज्यस्तरावर नेण्याचा संस्थेचा मानस आहे.

केंद्र शासनाच्या अनुदानातून अटल टिंकरीग लॅब नाशिक, नाशिकरोड, इगतपुरी येथील माध्यमिक शाळांमध्ये सुरु झाल्या असून सिन्नर येथेही लवकरच सुरु होईल. या अटल टिंकरिंग लॅब मधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, सेन्सर, ३डी प्रिंटिंग याची ओळख होते त्याचबरोबर प्रोग्रॅमिंग,रोबोटिक्स हे शिकायला मिळते. तसेच या डिजीटल युगामध्ये संस्थेतील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानात मागे राहू नये म्हणून IOT (Internet of Things) सारखे उपक्रमही चालू केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षिणिक धोरण राबवण्यास संस्था तयार असून, त्याची प्राथमिक तयारी म्हणून विद्या भारती या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक अशा विविध स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. या संस्थेचे अभ्यासक्रमही प्राथमिक स्तरावर चालू आहेत. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास व्हावा या दृष्टीने संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहेच. परंतु त्याच बरोबर त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेने क्रीडा प्रबोधिनी सुरू केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून टेनिस, हॉलीबॉल, कॅरम, ज्युदो, कुस्ती, खोखो, कबड्डी, बुद्धिबळ, मल्लखांब, इत्यादी विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावेत हा यामागील उद्देश आहे. या क्रीडा प्रबोधिनीचे यश म्हणजे संस्थेतील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. संस्था स्तरावर व विविध शाळांमध्ये राबवले जाणारे उपक्रम याबाबत सर्वांना माहिती व्हावी व विद्यार्थी, शिक्षक यांच्या लेखन कलेचा विकास व्हावा, त्यांच्या विचारांना व्यासपीठ असावे, यादृष्टीने संथेचे सर्वसाधारण सभेचे माजी अध्यक्ष कै. द.शं. तथा काका नाईक यांच्या प्रेरणेने संस्थेने २००८ सालापासून “ज्ञानयात्री” हे त्रैमासिक सुरू केले आहे.

संस्थेला माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, माधव मनोहर, दत्ता भट, शिवाजी तुपे, बापू नाडकर्णी, माजी खासदार कै. गो. ह. देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, खासदार कै.उत्तमराव ढिकले, अभिनेते गिरीश ओक, डॉ. रमेश रासकर (MIT लॅब, बोस्टन) यांसारखे अनेक मान्यवर व प्रतिथयश माजी विद्यार्थी आहेत संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना, उपक्रमांना मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत यामध्ये माजी रेल्वेमंत्री स. का. पाटील, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी, सेतुमाधवराव पगडी, शंकर अभ्यंकर, यु. म. पठाण, शांताबाई किर्लोस्कर, रा.स्व.संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रवीण दवणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारख्या अनेक मान्यवरांचा उल्लेख करता येईल.

“न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते“, भगवद्गीतेत म्हटल्या प्रमाणे. या जगात ज्ञानासारखे पवित्र व शुद्ध असे काही नाही. असे पवित्र व शुद्ध ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यात राष्ट्रभक्तीची बीजे पेरून एक आदर्श नागरिक घडावा असा प्रयत्न संस्था सातत्याने करीत आहे. संथेची ही दैदीप्यमान व उज्ज्वल परंपरा अशीच राखून, संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी संथेचे सर्व घटक कटिबद्ध आहेत, असा विश्वास व्यक्त करतो. संथेच्या वर्धापन दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या, जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

अश्विनीकुमार भानुदास येवला, सेक्रेटरी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या