नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँक निवडणूक : ‘सहकार’चे 19 उमेदवार बिनविरोध

jalgaon-digital
5 Min Read

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आज माघारीच्या दिवशी अभूतपुर्व घडामोडी झाल्या. परिवर्तन पॅनलच्या महिला राखीव गटातील संगिता गायकवाड वगळता सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी सहकार पॅनलमधील 19 उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

बँकेच्या बहुचर्चित पोटनियम 40 च्या मंजूरीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी निवडणूक निर्णय अधिकार्‍याने केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या गुरुवारच्या अखेरच्या दिवशी विरोधी परिवर्तन पॅनलच्या वैध इच्छुक उमेदवारांनी सहकार खाते भ्रष्टचाराने बरबटल्याचा व सताधार्‍यांना मॅनेज झाल्याचा आरोप केला. त्यांच्या 46 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सत्तारुढ सहकार पॅनलच्या 19 जागा बिनविरोध निवडून आल्या.

महिला राखीव गटात संगीता गायकवाड यांचा पोटनियम 40 नुसार अवैध ठरवलेला अर्ज बॅँकेने त्यांच्या ठेवी व शेअर्स रक्कम नियमाप्रमाणे असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले. त्यामुळे त्यांचा अवैध ठरवलेला अर्ज वैध ठरविण्यात आला. महिला गटाच्या दोन जागांसाठी सहकार पॅनलच्या रंजना बोराडे, कमल आढाव व परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज राहिल्याने महिला गटासाठी निवडणूक होणार आहे.

बिनविरोध निवड

सर्वसाधारण गट – निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, वसंत अरिंगळे, जगन आगळे, सुनील आडके, मनोहर कोरडे, गणेश खर्जुल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, अरुण जाधव, रमेश धोंगडे, योगेश नागरे, विलास पेखळे, डॉ. प्रशांत भुतडा. इतर

मागास वर्ग गट – सुधाकर जाधव. विमुक्त जाती भटक्या जमाती- प्रकाश घुगे. अनुसूचित जातमी गट-रामदास सदाफुले. या सर्वांचे अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

उमेदवारी अर्ज माघारीच्या दुपारी तीनच्या मुदतीत परिवर्तनच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सहकार पॅनलचे 19 उमेदवार निवडून आल्याचे स्पष्ट होताच प्रचार कार्यालयाबाहेर गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पॅनलचे नेते निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड विजयी उमेदवारांचे मिठी मारून स्वागत करत होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फोन करून दत्ता गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह मान्यवरांनी सहकार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या गुरुवारी (दि.1) अखेरच्या दिवशी काही इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. दरम्यान, परिवर्तन पॅनलचे अशोक सातभाई, हेमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या कार्यालयात जाऊन पूर्ण निवडणूक प्रक्रिया सहकार खात्याच्या अधिकार्‍यांनी सत्तारुढ सहकार पॅनला मॅनेज असल्याचा आरोप केला. निषेधाच्या घोषणा देत बलसाने यांच्यावर नोटांची उधळण केली. सहकार खात्याचा तीव्र निषेध करत परिवर्तनकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे निवडणुक रिंगणात फक्त 23 इच्छुकांचे अर्ज राहिले.

आम्ही 2006 पासून सत्ता मिळाल्यापासून बँकेची जोरदार प्रगती केली, विकास कामे केली. बँकेला नफ्यात आणले. त्यामुळे खातेदार, सभासदांचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. सभासदांना आम्ही दहा टक्के लाभांश दिला. विरोधकांकडे उमेदवारीसाठी माणसेच नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली.

दत्ता गायकवाड (सहकार पॅनल)

पोट नियम क्रमांक 40 दुरुस्तीला सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी दिली होती. यंदाच्या निवडणुकीच्या दोन वर्षे आधी आम्ही पोट नियम क्रमांक 40 बाबत वृत्तपत्रातून जाहिरात देऊन जागृती केली होती. अनेक सभासदांना निवडणुक बिनविरोध व्हावी असे मनोमन वाटत होते. परंतु, विरोधकांनी त्यांच्या अपेक्षांना छेद देत सहकार मंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळवला होता.

निवृत्ती अरिंगळे (सहकार पॅनल)

निवडणूक झाली असती तर बँकेचे म्हणजेच सभासद, खातेदारांचे पैसे खर्ची पडले असते. हा खर्च टळावा म्हणून आमच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. सभासदांनी आमच्यावर विश्वास कायम ठेवला, प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. पुण्यापासून नाशिकपर्यंतचे निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधार्‍यांना मॅनेज झाल्याचा आमचा आरोप मात्र कायम आहे. त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

हेमंत गायकवाड (परिवर्तन पॅनलचे नेते)

व्यापारी बॅँकसंचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 124 उमेदवार रिंगणात होते. पोट नियम क्रमांक 40 च्या मंजुरीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी अंमलबजावणी करत छाननी प्रक्रियेत वैध ठरवलेल्या अर्जांपैकी 56 उमेदवारी अर्ज अवैध ठरवले. त्यामुळे 68 उमेदवारांचे अर्ज राहिले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सोयीचा अर्थ काढून 56 इच्छुकांचे अर्ज बाद केल्याचा आरोप परिवर्तन पॅनलचे अशोक सातभाई व हेमंत गायकवाड यांनी केला होता. अर्ज अवैध ठरविल्याने परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीने उभे राहू शकत नव्हते. यामुळे निवडणुकीतील चुरस संपली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *