Friday, April 26, 2024
Homeनाशिक'वन फिफ्टी वन'च्या निमित्ताने नाशिकचे होणार जोरदार 'ब्रॅण्डिंग'

‘वन फिफ्टी वन’च्या निमित्ताने नाशिकचे होणार जोरदार ‘ब्रॅण्डिंग’

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटामुळे ब्रेक लागलेल्या जिल्ह्याच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा जल्लोष यंदा धुमधडाक्यात साजरा केल‍‍ा जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या नियोजन आराखडयात २५ कोटी निधीची तरतुद केली आहे.

- Advertisement -

मालेगाव ते पेठ आणि सटाणा ते सिन्नर असे जिल्ह्याचे चार भाग करुन ३६० अॅगलमध्ये जिल्ह्यातील ऐतिहासिक, पौराणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक यांसह आधुनिकतेच्या सर्व पैलूंचे जोरदार ब्रॅण्डिग केले जाणार असून जिल्हाप्रशासन त्यासाठी कामाला लागले आहे.

ब्रिटिश काळात सन १८६९ मध्ये नाशिक जिल्हा निर्मिती झाली. सी.आर. ओव्हन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते. तर १९४७ मध्ये एम.जी. पिम्पुटकर हे पहिले मराठी जिल्हाधिकारी जिल्ह्याला लाभले. इतिहासाच्या अनेक वळणावरून पुढे जात असताना आणि प्रगतीचे विविध टप्पे पार करताना जिल्ह्याने देशासह राज्यात वेगळी अोळख निर्माण केली आहे.

१५० वर्षाची ही गौरवशाली वाटचाल अधिक स्मरणीय व्हावी यासाठी जिल्हाप्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी या सोहळ्यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

गतवर्षी करोना संकट आल्याने हा सोहळा होऊ शकला नाही. मात्र आता करोना संकट उतरणीला लागले असून जिल्हा निर्मितीची दीडशे वर्ष पुर्ती सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे.

भौगोलिकदृष्टया जिल्ह्याचे मालेगाव ते पेठ आणि सटाणा ते सिन्नर असे चार विभाग पडतात जसे की सुरगाणा पेठ सारखा आदिवासी बहुल विभाग, कसमादे पट्टा, नाशिक व लगतच्या भाग आणि मालेगाव मधील मुस्लिम बहुल भाग या सर्व ठिकाणची बलस्थाने या कार्यक्रमांमध्ये सामावून घेऊन ते हायलाईट केले जाणार आहे.

त्यासाठी सर्वांशी चर्चा केली जाणार असून नाशिक मधील सर्वच क्षेत्रातील महत्वाची मंडळी एका छताखाली येणार आहेत.

नाशिक वन फिफ्टी वन हा केवळ एका वेळेचा उत्सव नसून त्यामधून अत्यंत दूरगामी उपयोगी ठरतील असे अनेकविध उपक्रम घेणे हा खरा आपला उद्देश आहे. नाशिक जिल्ह्याचे चार भाग करुन तेथील बारकावे व समृध्द परंपरेचे या उत्सवातून ब्रॅण्डिंग केले जाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या