Thursday, April 25, 2024
Homeनगर‘नाशिक मध्यवर्ती’त अडकल्या नगरच्या 400 कोटींच्या ठेवी

‘नाशिक मध्यवर्ती’त अडकल्या नगरच्या 400 कोटींच्या ठेवी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे चारशे कोटींच्या ठेवी, भागभांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहेत.

- Advertisement -

ही बँक अडचणीत आल्यापासून पतसंस्थांना या ठेवी परत मिळत नाही. याबाबत राज्य पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व स्थैर्यनिधी संघाने अनेकदा आंदोलने करण्याबरोबरच सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. दरम्यान, याप्रकरणी विभागीय सहनिबंधक यांनी मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

नाशिक विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेर यांनी आंदोलनानंतर काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्ज माफीचे पैसे शासनाकडून जमा होताच आम्ही पतसंस्थांचे पैसे परत देऊ, असे आश्वासन दिले होते.

शासनाचे कर्जमाफीचे पैसे बँकेत जमा होऊनही बँक पतसंस्थांच्या ठेवी परत करत नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यावर गेल्या 28 ऑगस्टला प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांच्या कक्षात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटेे व पदाधिकार्‍यांसह महत्त्वपूर्ण बैठक झाली.

सहकार मंत्र्यांनी याबाबत निर्णय घेऊन मार्ग काढण्यासाठी तातडीने एकत्र बैठक घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार तातडीने या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन सहाय्यक निबंधकांनी करावे, अशी मागणी स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक गोपाळ पाटील, प्रकाश गवळी, नंदकुमार खैरनार यांनी नाशिक निबंधक कार्यालय व नाशिक मध्यवर्ती बँकेकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या