Nashik Bus Accident : समशेरपुरातील मामा-भाच्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

राजगुरूनगर डेपोच्या बसने पाठीमागून एका मोटारसायकलला तसेच सिन्नर डेपोच्या बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील मामा – भाच्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावाजवळ घडली आहे. या घटनेने समशेरपूर गाव व संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातामध्ये मोटारसायकलवर असणारे दोन युवक बसच्या चाकाखाली अडकले आणि बसने अचानक पेट घेतला. या घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रवींद्र विसे ( वय 32) आणि मदन साबळे (वय 39) यांचा जागीच जळून मृत्यू झाला. बसमधील 41 प्रवासी जखमी झाले असून, नाशिकच्या बिटको हॉस्पिटल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु होते. हा अपघात शेकडो नागरिकांच्या डोळ्यासमोर घडत असतांना कुणीही मदतीला पुढे आले नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या अपघातात दोन युवकांचा बसखाली जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेने अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.

अकोलेतील माय-लेकीसह अन्य प्रवासी बचावले

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रुपाली या आपल्या भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे निघाल्या होत्या. ज्या बसचा अपघात झाला त्या बसमध्ये त्याही होत्या. रुपाली सांगतात, आम्ही नाशिकला येण्यासाठी सिन्नर येथून बस पकडली. शिंदे- पळसे येथे टोल नाका बसने ओलांडला मात्र पुढे बस थांबायला तयार नव्हती अन् अचानक बसच्या चालकाने गाडीतून उडी मारली. बस समोर चालत असलेल्या दुचाकींना चिरडत वेगात पुढे जात असताना समोर उभ्या दुसर्‍या बसला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की आम्ही सिट वरून उडून खाली पडलो. यात माझ्या लहान मुलीला गंभीर इजा झाली.

बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागताच बाहेर उभ्या नागरिकांनी आम्हाला बसमधून बाहेर येण्यासाठी मोठ मोठ्याने आरोळ्या दिल्या. मात्र बसच्या पुढील दाराच्या बाजुने धडक लागल्यामुळे मुख्य दरवाजा लॉक झाला होता. अन् तेथून बसने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून अथक प्रयत्नांनी दरवाजा उघडला अन् आम्ही बसमधून बाहेर आलो. आम्ही बसमधून उतरून अगदी 10 पावलं चालतो तोच संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये माझं सोनं अन् रोख रक्कम जळून खाक झाली. असा भयावह अनुभव रुपाली यांनी सांगितला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *