Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनासाका नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू

नासाका नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Cooperative Sugar Factory ) भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबत झालेल्या निर्णयाचे कार्यक्षेत्रातील सर्वच घटकांनी स्वागत केले असून सभासदांनी ऊस लागवडीचे प्राधान्य देत कामगारांनीही कंपनीच्या मागणीनुसार वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन नाशिक साखर कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे व इतरांनी केले आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ( NDCC Bank )प्रशासकीय अधिकारी अरुण कदम यांनी कारखाना सुरू करणेबाबत घेतलेली भूमिका, दिपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांनी याकामी दिलेला प्रतिसाद, खा. हेमंत गोडसे यांनी केलेले प्रयत्न व आ. सरोज अहिरे यांनी केलेला पाठपुरावा यामुळेच आज शेतकरी, कामगार, परिसरातील छोटे मोठे व्यवसायिक यांच्या जीवनात पुनश्च आनंदाचे दिवस सुरू होत आहे.

दि.2 एप्रिल रोजी कारखाना गेट उघडल्यानंतर तीन तारखेपासून युद्धपातळीवर कारखाना दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता कारखान्याच्या विविध घटकांनी कंपनी प्रशासनास मदत करण्याचे आवाहन कामगार संघटनेच्यावतीने करण्यास आले. कारखान्यास आवश्यक असलेला ऊस पुरवठा करण्याची जबाबदारी ऊस उतपादन शेतकरी यांची आहे. याकरिता येत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात आडसाली तसेच सप्टेंबर ते डिसेंबरअखेर अर्ली सुरू उसाची को. 86032 या जातीची जास्तीत जास्त लागवड करावी. तसेच ज्या शेतकर्‍यांकडे खोडवा ऊस आहे. त्यांनी कंपनीचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधून नोंद करावी.

तसेच कंपनीचे आवश्यकतेनुसार कामावर बोलविलेल्या कामगारांनी हजर व्हावे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कारखाना कामगार युनियन, कामगार सोसायटी, पीएफ फंड कार्यालय यांचेतील प्रश्न व सुप्रीम कोर्टात जमा केलेल्या रकमेबाबद खा. गोडसे यांनी संबंधित अधिकारी तसेच सुप्रिम कोर्टातील वकील यांचेसोबत दिल्लीत मिटिंगा घेऊन लवकरात लवकर कामगारांना व बॅकेलाही कोर्टातील रक्कम मिळावी, याकामी मध्यस्थी केलेली आहे.

जिल्हा बँकेने देखील या कामी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सभासद व कामगार यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्यध्यक्ष कॉ. शिवराम गायधनी, संतु पाटील, देवकिसन गायखे, नामदेवराव बोराडे, शंकरराव रोकडे, शरद पगार, भाऊसाहेब आडके, दत्तात्रय कर्पे, कांतीलाल गायधनी, शिवाजीरराव म्हस्के, नामदेवराव गायधनी, उत्तमराव सहाणे, भाऊसाहेब गायकवाड, शरदराव टिळे, माणिकराव कासार, ज्ञानेश्वर गायधनी, संजय तुंगार, अशोकराव जाधव, अशोक खालकर, बाजीराव बरकले, तुकाराम गायधनी आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या