Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनानेगाव रस्ता पुन्हा वादात

नानेगाव रस्ता पुन्हा वादात

देवळाली कॅम्प । वार्ताहर

भगूर-नानेगाव हा पारंपारिक वाहिवटीचा रस्ता बंद करण्याचा घाट पुन्हा लष्करी आस्थापनेकडून घातला जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. खा. हेमंत गोडसे यांच्यासह लष्करी अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ब्रिगेडीयर ए. राजेश यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली यातून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. तर जोपर्यंत या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत सदर रस्ताचा वापर करून द्यावा व संरक्षक भिंतीचे काम थांबवावे, अशी मागणी खा.गोडसे यांनी केली.

- Advertisement -

भगूर नानेगाव हा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता असून भगूरच्या उड्डाणपूलाजवळून मरिमाता मंदिर ते पुढे फरजंदी बाग व नानेगाव असा वाहतूकीचा मार्ग आहे. शेकडो वर्षांपासून नागरिक त्याचा वापर करत असतांना दोन वर्षापासून लष्करी आस्थापनेकडून विजयनगर भागात त्यांचे कार्यालय व रहिवासी इमारती उभे करणेकामी संरक्षण भिंतीचे काम सुरू केलेले आहे. या कामात रेल्वे उड्डाणपुल ते मरीमाता मंदिर हा शंभर मीटरचा परिसर कळीचा मुद्दा ठरत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गतवर्षी झालेल्या बैठकीत तत्कालीन ब्रिगेडीयर पी. रमेश, जे.एस. गोराया यांनी नऊ मीटर रस्ता ग्रामस्थांसाठी देण्याबाबत तयारी दाखवून तसे लेखी पत्र नानेगाव ग्रामपंचायतीला दिलेले आहे. तसेच दोन वर्षात तीन ब्रिगेडियर यांनी रस्त्याची पाहणी करत ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही, असे सांगितले होते. मात्र नवा गडी नवा राज्य याप्रमाणे नविन आलेल्या अधिकार्‍यांनी संपूर्ण परिसराला कंपाऊंड करणे सुरू केल्यामुळे नानेगावसह रस्त्याचा वापर करणार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली.

काल सकाळी खा. हेमंत गोडसे, ब्रिगेडीयर ए. राजेश, कर्नल अतुल बिस्ट, मार्केंडय आदि घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कँन्टोमेन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, अशोक आडके, विलास आडके, ज्ञानेश्वर काळे, रामदास शिंदे, भगवान आडके, प्रविण आडके, सरपंच सुनंदा काळे, उपसरपंच विमल आडके, कैलास आडके, सुनिल मोरे, संदिप आडके, दत्तू आडके आदि उपस्थित होते.

यावेळी ब्रिगेडीयर ए.राजेश व खा. गोडसे यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांत झालेल्या चर्चेनुसार ब्रिगेडीयर राजेश यांनी रेल्वे हद्दीलगत सरंक्षक भिंत उभे करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांना वापरासाठी जुना रस्ता दिला जाणार असल्याचे नियोजित आहे. मात्र खा.गोडसे यांनी जोपर्यंत नानेगाव ग्रामस्थांसाठी रस्ता तयार करून तसे लेखी स्वरूपात दिल्याशिवाय सुरू असलेला वाहतूकीचा मार्ग बंद करू नये, असे सुचित केले. यावर लष्करी अधिकार्‍यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेवून त्यानुसार कार्यवाही करू असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या