Saturday, May 11, 2024
Homeनगरनांदुर्खी बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूक सरपंचपदासाठी चौरंगी लढत

नांदुर्खी बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूक सरपंचपदासाठी चौरंगी लढत

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

नांदुर्खी बुद्रूक ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणूक येत्या 18 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे नांदुर्खीचे वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन थंडीच्या तडाख्यातही वातावरण तापू लागले आहे. जनतेतून सरपंच शिंदे फडवणीस सरकारने घेतलेल्या निर्णयाने यात आणखी भर पडली.

- Advertisement -

सत्ताधारी गटाच्या झोटिंगबाबा ग्राम विकास मंडळाच्या पॅनेलचे नेतृत्व सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव नारायण चौधरी, माजी सरपंच आप्पासाहेब नारायण चौधरी, माजी उपसरपंच संजय चौधरी, संजय कुदळे हे करत आहेत. या मंडळाकडून विद्यमान सरपंच विद्या चौधरी यांचे पती योगेश आपासाहेब चौधरी यांना रणांगणात उतरविले आहे. तर तीन ही वार्डात परीपुर्ण पॅनल त्यांनी उभे केले आहे. विरोधी जनसेवा ग्रामविकास मंडळ माजी सरपंच राजेंद्र जयराम चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब चौधरी, माजी उपसरपंच बापूसाहेब दाभाडे, माजी चेअरमन भाऊसाहेब चौधरी, दादासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खिंड लढवित आहे.

साईश्रद्धा विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव बाबुराव चौधरी सरपंच पदासाठी जनसेवा ग्रामविकास मंडळाकडून लढत देत आहे. जय हनुमान युवा ग्रामविकास मंडळ नव्यानेच या निवडणुकीमध्ये सहभागी झाले आहे. या मंडळाचे नेतृत्व बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाध्यक्ष शिवाजी सोपान चौधरी यांच्या खांद्यावर असून ते स्वतः सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. या बरोबरच आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार पक्षाचे तालुक्याचे संघटक वसंतराव काळे यांनी थेट सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

नांदूर्खी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चारही वार्डाची मतदारांची संख्या साडेतीन हजार असून निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहेत. गावात चौरंगी लढत होत असल्याने या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जनसेवा ग्रामविकास मंडळ व झोटिंगबाबा ग्रामविकास मंडळ हे दोन्ही गट आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना मानणारे आहे.

यापूर्वी विखेच्याच दोन गटात लढत व्हायची. मात्र यावेळी चौरंगी लढतीमुळे चित्र वेगळे आहे. रात्री अपरात्री वाड्या वस्त्यावर जाऊन प्रचार करण्यात कार्यकर्ते दंग झाले आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. नांदुर्खीच्या विकासाची ब्लूप्रिंट सोशल संदेशाव्दारे मतदारांपर्यत पोहचविण्याचा आटापिटा सर्वच उमेदवारांकडून सुरू आहे.

चारही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत झोटिंगबाबा व बजरंगबलीच्या चरणी लीन होऊन प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला. चौका-चौकात मीच येणार या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मात्र नांदुर्खीच्या सुज्ञ मतदारांवर आवलंबून असून नांदुर्खीकर कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ टाकतात हे येत्या 18 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या