Friday, May 10, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा जि.प.गटवगळता नंदुरबार जिल्हा परिषदेत ‘जैसे थे’ स्थिती राहणार !

अक्कलकुवा जि.प.गटवगळता नंदुरबार जिल्हा परिषदेत ‘जैसे थे’ स्थिती राहणार !

राकेश कलाल – Nandurbar – नंदुरबार :

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज महिला आरक्षण काढण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्ग काढून त्या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

परंतू या प्रवर्गात कोणताही उमेदवार उभा राहू शकत असल्याने फक्त अक्कलकुवा जिल्हा परिषद गट वगळता इतर सर्व गटांमध्ये ‘जैसे थे’ स्थिती राहणार आहे.

जिल्हा परिषदेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागांवर घटनेनुसार आरक्षण देता येत नाही तरीही नंदुरबारसह राज्यातील इतर पाच जिल्हा परिषदांमध्ये फेर आरक्षण काढून त्याठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला स्थान देण्यात यावे, याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देवून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करुन त्याठिकाणी नव्याने आरक्षण काढून पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 4 मार्च 2021 पासून भूषण रमेश कामे (खापर), कपिलदेव भरत चौधरी (अक्कलकुवा), अभिजीत मोतीलाल पाटील (म्हसावद ), जयश्री दिपक पाटील (लोणखेडा), धनराज काशिनाथ पाटील (पाडळदे बु), शालिनीबाई भटू सनेर (कहाटुळ), योगिनी अमोल भारती (कोळदे), शोभा शांताराम पाटील (खोंडामळी), अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी (कोपर्ली), शकुंतला सुरेश शिंत्रे (रनाळा), रुचिका प्रविण पाटील (मांडळ) या जिल्हा परिषद सदस्यांचे तसेच विजयता दिलीप बोरसे (कोराई गण), वैशाली किशोर पाटील (सुलतानपूर ), विद्या विजय चौधरी (खेडदिगर), सुषमा शरद साळुंखे (मंदाणे), श्रीराम धनराज याईस (डोंगरगाव), कल्पना श्रीराम पाटील (मोहिदे तह), रविद्र रमाकांत पाटील (जावदे तबो ), योगेश मोहन पाटील (पाडळदे ब्रु), शिवाजी मोतीराम पाटील (शेल्टी), धमेंद्रसिंग देविसिंग परदेशी (गुजरभवाली), लताबेन केशव पाटील (पातोंडा), दिपक भागवत मराठे (होळ तर्फे हवेली), अनिता अशोक राठोड (नांदर्खे ), सीमा युवराज माळी (गुजरजांभोली) या पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेत एकुण 56 गट असून 112 पंचायत समित्यांचे गण आहेत. त्यापैकी 11 जि.प.गट व 14 पं.स.गणांमध्ये पोटनिवडणूका घेण्यात येत आहेत.

त्यानुसार 11 जि.प.गट आणि 14 पंचायत समिती गणांमध्ये आज सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण काढून त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आज महिला आरक्षण काढण्यात आले.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांपैकी पाच गटांमध्ये महिलांचे आरक्षण काढण्यात आले आहे तर उर्वरित सहा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी काढण्यात आले आहे.

जिल्हयातील खापर ता.अक्कलकुवा, म्हसावद ता.शहादा, लोणखेडा ता.शहादा, पाडळदे ता.शहादा, खोंडामळी ता.नंदुरबार, कोपर्ली ता.नंदुरबार हे गट सर्वसाधारण असून कोळदे ता.नंदुरबार, मांडळ ता.नंदुरबार, रनाळा ता.नंदुरबार, कहाटूळ ता.शहादा, अक्कलकुवा ता.अक्कलकुवा हे गट सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत.

यापुर्वी नागरिकांचा मागासप्रवर्गातून भुषण कामे, अभिजीत पाटील, जयश्री पाटील, धनराज पाटील, शोभा पाटील, राम रघुवंशी, योगिनी भारती, रुचिका पाटील, शकुंतला शिंत्रे, शालीनी सनेर, कपिल चौधरी हे उमेदवार विजयी झाले होते.

आज काढण्यात आलेल्या आरक्षणाचे अवलोकन केले असता फक्त अक्कलकुवा गटातील कपिलदेव चौधरी यांच्या जागी महिला उमेदवार निवडून येणार आहे. अक्कलकुवा गट आता सर्वसाधारण महिला राखीव झाला आहे. त्यामुळे चौधरी यांना त्या ठिकाणी उभे राहता येणार नाही.

कदाचित त्यांच्या घरातील महिला सदस्य त्याठिकाणी उमेदवारी करु शकतील. तसेच लोणखेडा गटातून जयश्री दीपक पाटील तर खोंडामळी गटातून शोभा शांताराम पाटील निवडून आल्या आहेत. हे दोन्ही गट आता सर्वसाधारण झाले आहेत. परंतू सर्वसाधारण गटावर कोणालाही उभे राहता येत असल्याने याच दोन्ही उमेदवार त्याठिकाणी उभे राहण्याची शक्यता आहे. उर्वरित खापर, म्हसावद, पाडळदे, कोपर्ली या गटांमधील सदस्य जैसे थे राहणार आहेत. कोळदे, मांडळ, रनाळा, कहाटूळ या गटांवर यापुर्वीच महिला निवडून आल्या असून आतादेखील हे गट महिला राखीव झाले आहेत. त्यामुळे अक्कलकुवा गट वगळता जिल्हा परिषदेच्या इतर गटांवर ‘जैसे थे’ स्थिती राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या