Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारवाळूचे डंपर वस्तीत शिरले, दोन युवकांचा मृत्यू

वाळूचे डंपर वस्तीत शिरले, दोन युवकांचा मृत्यू

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

तालुक्यातील साक्री रस्त्यावरील नांदरखेडा गावात भरधाव वेगातील वाळूचे डंपर शिरल्याने दोन युवकांचा झोपेतच मृत्यू झाला.

- Advertisement -

तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच एक म्हैस, एक पारडू व दोन बकर्‍यांचाही या अपघातात बळी गेला आहे.

मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सकाळी ग्रामस्थांनी रास्तारोको करुन रोष व्यक्त केला. त्यामुळे सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.14 रोजी मध्यरात्री 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास मध्यवर्ती जेलजवळील नांदरखेडा या गावाजवळून भरधाव वेगातील वाळूचे डंपर (क्रमांक एमएच 04-जेके 5455) जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने शेतातच वस्ती असलेल्या बंजारा समाजाच्या तांडयात सदर डंपर शिरला.

या अपघातात घर उध्वस्त होवून घरात झोपलेले प्रविण बाबुलाल राठोड (26) व विक्रम श्रावण जाधव (20) दोन्ही रा.नांदरखेडा यांचा झोपेतच मृत्यू झाला.

तर दिनेश सुकलाल पवार हा गंभीर जखमी झाला. या अपघातात एक म्हैस, एक पारडू, दोन बकर्‍यांचाही बळी गेला असून एक युनीकॉर्न मोटरसायकलीचा चक्काचूर झाला आहे.

मध्यरात्री आढावलेल्या या भयानक प्रसंगामुळे नागरिकांनी आरडाओरड केला. मात्र, घटना घडताच डंपर चालकाने तेथून पलायन केले. या घटनेबाबत सर्वत्र माहिती पसरल्याने सकाळी मोठया प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली.

यावेळी संतप्त नागरिक तसेच बंजारा समाजातील नागरिकांनी रास्तारोको केले. त्यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.

पोलीसांनी या नागरिकांची समजूत काढत संबंधीत डंपरचालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत दिनेश सुकलाल पवार (रा.नांदरखेडा) याने दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या