Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारकारवाई महाराष्ट्रात ; धसका गुजरातला

कारवाई महाराष्ट्रात ; धसका गुजरातला

नरेंद्र बागले,शहादा – Shahada :

अनधिकृत बायोडिझेल पंप, त्यात होणारी भेसळ आणि बायोडिझेलच्या नावाखाली होणार्‍या अवैध इंधनविक्रीच्या प्रकाराचा पर्दाफाश

- Advertisement -

झाल्यामुळे नाशिक-मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील पंप रातोरात गायब झाले तर काही पंप प्रशासनाने सील केले आहेत.

याची दखल सीमेलगताच्या गुजरात राज्यातही घेतली गेली असून गुजरातच्या पेट्रोल-डिझेल पंप डीलर्स असोसिएशनने तेथील अश्या अनधिकृत पंपाबाबत आवाज उठविल्याने गुजरातमधील सुमारे शंभर बायोडिझेल पंप बंद झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेत राज्यभरात अनधिकृतपणे बायोडिझेल पंप थाटण्यात आले होते. नफेखोरी करण्यासाठी बायोडिझेलमध्ये भेसळ करून अवैधरित्या इंधन विक्री करण्याचा नवा गोरखधंदा या व्यवसायातील महाभागांनी शोधून काढला होता.

या धंद्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागोजागी रस्त्यांवर शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून थाटण्यात आलेल्या अश्या अनधिकृत पंपांबाबत प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष जाऊ नये याबाबत विविध तर्क वितर्काना उधाण आले होते.

राज्यभरात असे सुमारे साडेचारशे पंप थाटण्यात येऊन शासनाचा लाखोंचा महसूल या महाभागांनी बुडविल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. याबाबत व ‘देशदूत’ने उतर महाराष्ट्रातील अश्या अनधिकृत बायोडिझेल पंपांचा भांडाफोड केल्याने अनेक पंप रातोरात गायब झालेत तर काही पंपांवर कारवाई करण्यात आली.

शहादा येथीलही अनधिकृत बायोडिझेल पंपातून अवैध इंधन विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने प्रशासनाने कारवाई करीत हा पंप सील केला.

अनधिकृत बायोडिझेल पंपांमधून अवैधरित्या इंधनविक्रीचा प्रकार उघडकीस आल्याने मालेगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्हयातील गुजरात राज्याच्या सीमेवरील बायोडिझेल पंप बंद झाले. याची दखल थेट गुजरातच्या पंप मालकांनी घेतली.

सुरत व तापी जिल्हा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन सुरतच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. त्यामुळेच कारवाईच्या भितीपोटी गुजारातमधील शंभाराहुन अधिक बायोडिझेल पंप बंद झाले आहेत. मात्र, या पंपांवर कठोर कारवाईची मागणी संघटनेने लावून धरली आहे.

फेडरेशन ऑफ गुजरात पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दि.27 ऑगस्ट रोजी बडोदराच्या डेप्युटी चीफ कंट्रोलर ऑफ एक्सक्लोजीव यांनाही याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केल्याने महाराष्ट्रासह गुजरातच्या बायोडिझेलच्या नावाखाली अवैधरित्या भेसळयुक्त इंधन विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

याचा फटका गुजरात कनेक्शन असलेल्या सुरत, बडोदरा व अंकलेश्वर येथील बायोडिझेल पुरवठा करणार्‍या कंपन्यांनाही बसला असून या कंपन्यांची चौकशीची मागणी पुढे येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या