Friday, April 26, 2024
Homeनगरनांदूर मधमेश्वर बंधार्‍याचे गेट असून अडचण नसून खोळंबा!

नांदूर मधमेश्वर बंधार्‍याचे गेट असून अडचण नसून खोळंबा!

राहाता तालुका | Rahata

गोदावरी कालव्यांच्या मुखाशी असणारे नांदूर मधमेश्वर बंधार्‍याचे गेट असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातील पाण्याची पातळी 32.40 फुट ते 32.50 फुट असावी लागते. परंतु त्यापेक्षा पाणी पातळी कमी झाल्यावर प्रथमत: उजव्या कालव्यातील प्रवाह कमी होतो आणि नंतर पातळी आणखी खाली गेल्यास डाव्या कालव्यावर परिणाम होतो.

- Advertisement -

सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 41 टिएमसीहुन अधिक पाणी वाहून गेले आहे. जायकवाडीत उपयुक्त साठा 89 टक्क्यांहून अधिक झाला. समन्यायी वाटपाची 65 टक्क्यांची अट 17 जुलै 2022 रोजीच ओलांडली. अजूनही गोदावरीत विसर्ग सुरुच आहे. गोदावरी कालव्यांना बिगर सिंचनासाठी पाणी सोडले आहे. परंतु नदी विसर्गाने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातील पाण्याची पातळी गेटचे नियंत्रण जबाबदारी ने न केल्याने कालव्याच्या मुखाजवळील पाणी पातळी घटते.

परिणामी गोदावरी कालव्यांना पाणी सोडूनही ते पूर्ण क्षमतेने वाहत नाहीत. या व्यवस्थापनातील त्रुटीमुळे मुबलक पाणी असूनही कालवे तुडूंब भरून वाहत नाहीत. नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातील पाण्याची आवक थोडी जरी वाढली तरी कोणताही विचार न करता गेट वर टांगून दिले जातात. परिणामी कालवा मुखाशी पाण्याची पातळी घटते. दि. 19 व 20 रोजी गेट टांगण्याचा असाच प्रकार केल्यामुळे बंधारा पातळी 24 फुटावर गेल्याने दोन्ही कालवे बंद पडले. वास्तविक नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून 19 जुलैला 39338 क्युसेकने विसर्ग व 20 तारखेला 27980 क्युसेकने नदी विसर्ग होत होता.

तो विसर्ग गेट वरती न टांगता नांदूरमधमेश्वर बंधारा पातळी 32.50 फूट ठेवून गेटमधून नदीत सोडता आला असता. दि. 22 रोजी बंधारा पातळी फक्त 31 फूट केली त्यामुळे गोदावरीचा उजवा 200 व डावा 100 क्युसेकने चालू शकेल. आजही तीच स्थिती आहे. वास्तविक पातळी 32.50 ठेवून कालवे पूर्ण क्षमतेने चालू ठेवता आले असते. परंतु नाशिक भागातील दबावाला बळी पडून ही पातळी ठेवली जात नाही! विशेष म्हणजे या प्रकारामुळे ओव्हरफ्लोचा कालावधी वाया जात आहे. गेट नव्हते त्यावेळी बंधार्‍यावरून सर्व पाणी नदीत जायचे.

परंतु गेट आल्यानंतर गेटमधून आणि बंधार्‍यावरून पाण्याचा विसर्ग संचालित करून वरील भागातील पूरस्थिती व गोदावरी कालवे दोन्ही बाबींवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल. वास्तविक बंधारा स्थळी 50000 क्युसेक प्रवाह होईपर्यंत फारसी पूरस्थिती निर्माण होत नाही. परंतु अती सावधानता म्हणून गेट वरती टांगून दिले जातात. त्यामुळे गोदावरी कालवे कोरडे होतात. यामध्ये तासागणिक नियमन होणे आवश्यक असताना त्याची गांभिर्याने कुणीच दखल घेत नाही.

वरील भागात पूर येणार नाही, याचीच सध्या अति खबरदारी घेतली जाते. त्या तुलनेत गोदावरी कालवे हा विषय कुणाच्याच हिशोबात नसतो. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कुणालाही याबाबत गांभिर्याने घेणे आवश्यक वाटत नाही. हे दुदैव आहे. जायकवाडी 37 टक्के झाल्यानंतर मेंढेगिरी अहवालातील पर्याय क्रमांक 1 अन्वये खरिपासाठी नोटीस काढणे आवश्यक होते. परंतु गरज असूनही त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.

गोदावरी नदीचा यथावकाश ओव्हरफ्लो बंद होईल आणि ओव्हरफ्लो बंद झाल्याने गोदावरी कालवेही बंद करण्यात येतील. त्यामुळे एकूणच आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय अशीच गोदावरी कालव्यांची कर्मगती म्हणावी लागेल. नांदूर मधमेश्वर गेटचे परिचलन, बंधार्‍यात होणारी पाण्याची आवक तसेच बंधारा पातळी कमीत कमी 32.50 फूट कशी राहील याचा एकात्मिक विचार करून होणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात असे होत नाही. बंधार्‍याचे गेट वरच्या भागात पुरस्थिती नसतांनाही अनाठायी आत्यंतिक भितीपोटी आणि जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने सरसकट वरती टांगून दिले जातात. वास्तविक तासागणिक एकात्मिक आढावा घेऊन गेट परिचलन केले तर कालवे पूर्ण क्षमतेने चालतील. परंतु हा त्रास घेण्याच्या ऐवजी गेट टांगणे हा सोयीस्कर, सरळधोपट आणि आरामदायी पर्याय निवडला जातो. त्यामुळे गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. मागील काही वर्षांपासूनचा अनुभव पाहता प्रशासन यात काही सुक्ष्म नियोजन करेल असे वाटत नाही. किंबहुना एवढी ओरड होऊनही त्यात काही सुधारणा करावी अशी मानसिकता दिसत नाही. हा लाभधारकांच्या सहनशक्तीचा दृश्य परिणाम म्हणावा लागेल! यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी गोदावरी कालव्याचे मुखाकडील गेट आणि बंधार्‍याचे गेट या दोहोंच्यामध्ये बंधारा फुगवट्यात साधारणपणे 50 मीटर लांबीची काँक्रिटची पक्की विभाजन भिंत बांधणे हा पर्याय आहे. अन्यथा समन्यायी बरोबरच चुकीच्या गेट परिचलनाचे दुष्टचक्रात गोदावरी कालव्याची कायम ससेहोलपट होत राहाणार यात शंका नाही.

– उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या