Thursday, April 25, 2024
Homeनगर‘मुळा’ 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन; 15 लाख टन गाळप उद्दिष्ट

‘मुळा’ 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन; 15 लाख टन गाळप उद्दिष्ट

सोनई |वार्ताहर| Sonai

मुळा कारखान्याचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन झाले असून सध्या अंतिम टप्प्यात असलेला इथेनॉल प्रकल्प ही येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.

- Advertisement -

शनिवारी 25 सप्टेंबर रोजी मुळा कारखान्यावर झालेल्या 51 व्या ऑनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले, संचालक भाऊसाहेब मोटे, संजय जंगले, कारभारी डफाळ, बाबुराव चौधरी, बबनराव दरंदले, दामोदर टेमक, बाबासाहेब भणगे, नारायण लोखंडे, निलेश पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब परदेशी, सोपान पंडित, रंगनाथ जंगले, कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बेल्हेकर व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

सभेत सहभाग घेतलेल्या सभासदांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. मागील हंगामाचा आढावा घेताना अध्यक्ष तुवर म्हणाले की, उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले असले तरी ऊस संपेपर्यंत गाळप हंगाम चालू ठेऊ व कोणताही ऊस गाळपा विना शेतात उभा राहणार नाही असा शब्द मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला होता तो शब्द संचालक मंडळाने पाळला. जवळपास 183 दिवस कारखाना चालवला. कारखान्याने यापूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे रोज सात ते आठ हजार टन गाळप घेऊन 2 मे रोजी सर्व उसाचे गाळप पूर्ण करण्यात आले. जवळपास 13 लाख टनाचे ऊस गाळप करण्यात आले. 34 कोटीची वीज निर्मिती केली. 21 कोटीची अल्कोहोल निर्मिती झाली. मागील हंगामात अतिरिक्त उसामुळे साखरेचे उत्पादनही अतिरिक्त झाले. मात्र दर महिन्याला साखर विक्रीच्या जो कोटा येत होता त्याप्रमाणे विक्री झाली नाही. साखर मंदीच्या भोवर्‍यात सापडली.

एक तर क्विंटलला 3700 रुपये खर्च येत असताना शासनाने मात्र 3100 रुपये किंमत ठरवली वारंवार मागणी करूनही त्यात वाढ केली नाही आणि आहे त्या भावात साखर विकली जात नव्हती. त्यात करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जे वारंवार छोटे मोठे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले त्याचा सर्वाधिक परिणाम साखर धंद्यावर झाला व साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ झाली.

तुवर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाकडून बफर स्टॉकचे क्लेम आणि निर्यात साखरेचे अनुदानही मिळाले नाही मात्र अशाही परिस्थितीत कारखान्याने जवळपास अकरा कोटीच्या दीर्घ मुदत कर्जाची परतफेड केली. सभासदांना पाच कोटीची ठेव परत केली. उसाची एफआरपी 2076 निघत असताना त्या ऐवजी 2100 रूपयाने सर्व ऊस उत्पादकांना पेमेंट करण्यात आले. कारखान्याने हाती घेतलेल्या 70 कोटी रुपये खर्चाच्या व दैनिक 45 हजार लिटर उत्पादन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे मृद संधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आलेले असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. उसाचा ज्यूस किंवा सिरप व बी हेवी मोलेसेस पासून इथेलॉनची निर्मिती केली जाणार असून त्याचे दर शासनाने निश्चित केले असल्याने व त्यासाठी ठरलेल्या मुदतीत पेमेंट मिळत जाणार असल्याने अनेक दिवसांपासून कारखान्याची होत असलेली आर्थिक कोंडी फुटण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या