Thursday, April 25, 2024
Homeनगरनालेगाव अमरधामला खासगी सुरक्षा

नालेगाव अमरधामला खासगी सुरक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या नालेगाव अमरधाममध्ये करोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यावेळी बाधित मृतांच्या नातेवाईक व कुटुंबियांची वाढती गर्दी लक्षात घेता महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने अमरधामच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, अमरधामचे मुख्य प्रवेशद्वार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी कल्याण रोडकडील छोटे प्रवेशद्वार खुले करण्यात आले असून त्यातून करोना बाधित मृताचे केवळ दोन नातेवाईक व शववाहिकालाच अमरधाममध्ये प्रवेश दिला जात आहे.

नालेगाव अमरधाममध्ये मोठ्या संख्येने करोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यामुळे येथील कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे. करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मृत रूग्णाच्या केवळ दोन नातेवाईकांनाच आत प्रवेश दिला जातो. मात्र काही नातेवाईक अरेरावी करत मोठ्या संख्येने आत येत आहेत. त्यामुळे शहरात करोना पसरण्याचा धोका आहे. नातेवाईकांनी गर्दी केल्यास अंत्यसंस्कार करतानाही अडचणी येत आहे.

तसेच काही नातेवाईकांकडून मनपा कर्मचार्यांना अरेरावी, शिवीगाळ केल्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त मागितला होता. मात्र बंदोबस्त प्रशासनाकडून न मिळाल्याने खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहे. गर्दी कमी करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारही बंद केेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या