Friday, April 26, 2024
Homeनगरनागवडे साखर कारखाना निवडणूक अनेकांना भोवली

नागवडे साखर कारखाना निवडणूक अनेकांना भोवली

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

नागवडे साखर कारखाना निवडणूक धुमधडाक्यात पार पडली असली तरी अनेकांनी करोनाकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच मतमोजणीत मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्याने तालुक्यातील अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यात काही अधिकारी आणि कर्मचारी यांनाही करोनाची लक्षणे जाणवत असल्याने मतमोजणीच्यावेळी केलेली गर्दी आणि विजयाचा जल्लोष यांना भोवणार आहे. दुसरीकडे प्रशासनाने निर्बंधाकडे दुर्लक्ष केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

करोनाचे निर्बंध असताना तालुक्यामध्ये धुमधडाक्यात पार पडलेल्या नागवडे कारखाना निवडणुकीत काम करणारे शासकिय अधिकारी व कर्मचारी आजारी पडले असल्याचे चित्र तालुक्यात आहे. एकीकडे सरकार करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. खासगी कार्यक्रम, लग्न समारंभ व अंत्यविधी तसेच एकत्र येण्यावर बंधने असताना निवडणुका मात्र सर्व निर्बंध शिथिल असल्याने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिक जमल्यास त्यांचेवर कारवाईचे आदेश असताना तालुक्यात गावोगावी, वाडी वस्तीवर सभा घेण्यात आल्या. प्रचाराच्या गाड्या गर्दीने ओसंडून वाहत होत्या. हॉटेल व ढाबे हाऊसफुल्ल होती. कुणावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात झाली नाही. यामुळे आता निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अनेकांना करोनाने गाठले आहे.

करोनाचे वातावरण निवळत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत. सभा, मंत्र्यांचे दौरे रद्द करावेत. रॅली किंवा निषेध मोर्चे यास परवानगी नाकारावी. राजकीय कार्यक्रम बंद करावेत. राजकीय बैठका व एकत्रिकरण बंद करावे, अशी मागणी दक्ष नागरिक संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केली आहे.

निवडणुकीनंतर अनेक कर्मचारी कोविडवर खासगी रुग्णालयात उपचार घेत असून आजारी असल्याने सुट्टीवर आहेत. त्यांच्या कामाचा टेबल सध्या रिकामा आहे. यामुळे सामान्य नागरिकांची कामे अडली आहेत. यामुळे खेड्यापाड्यातून येणार्‍या नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण? पोलीस दलात अनेक गुन्ह्यांचे तपास प्रगतिपथावर आहेत. परंतु पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. विना लस व विना मास्क दुकानात प्रवेश नाही, तर मतदानाच्या दिवशी लस घ्या आणि मगच मतदान करा, असे आवाहन का केले नाही. बाजारपेठा ओस आहेत. व्यापार्‍यांना मास्कवरून दंड करण्यात येत आहे. मग राजकारण्याचे काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या