Thursday, April 25, 2024
Homeनगरनागेबाबा मल्टीस्टेटची बनावट सोनेतारण कर्जाव्दारे फसवणूक

नागेबाबा मल्टीस्टेटची बनावट सोनेतारण कर्जाव्दारे फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणानंतर आता संत नागेबाबा मल्टीस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटीच्या केडगाव शाखेतही बनावट सोनेतारण कर्जाव्दारे फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बुधवारी करण्यात आलेल्या दोन कर्ज खात्यांच्या तपासणीमध्ये सुमारे 221 ग्रॅम वजनाचे सहा दागिने बनावट असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

बनावट दागिने गहाण ठेवून संस्थेची दोन लाख 78 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सोसायटीचे शाखाधिकारी अनिल रामकिसन देशमुख (वय 29 रा. कापरे मळा, सुशांत नगर, केडगाव, मुळ रा. भेंडा ता. नेवासा) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (रा. सदगुरू टॉवर्स, तपोवन रोड), श्रीतेश रमेश पानपाटील (रा. आलमगिर भिंगार), संदीप सिताराम कदम (रा. निमगाव वाघा ता. नगर), खातेधारक वसिम निसार शेख (रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वीच्या फसवणूक प्रकरणातील श्रीतेश पानपाटील याचा जामीन झाला होता. त्याला आता या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोतवाली पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा तपास सुरू आहे. शहर बँकेत आतापर्यंत सुमारे साडेनऊ किलो वजनाचे बनावट दागिने आढळून आले आहेत. त्याव्दारे शहर बँकेची सुमारे साडेतीन कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले, सुनील अळकुटे, श्रीतेश पानपाटील, संदीप कदम यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात खातेधारक तयार करून संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेत अजय कपाले याने सोनेतारण खातेधारकाचे कर्ज खाते तपासून सोनेतारण ठेवले आहे, अंदाजे 150 ते 200 खातेधरकांची बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणे केल्याची माहिती दिलेली आहे.

त्यामुळे गोल्ड व्हॅल्युअर अजय कपाले हा ज्या तारखेपासुन पॅनलवर आहे, त्या तारखेपासून तपासणी करण्याचे पत्र कोतवाली पोलिसांनी सोसायटीला दिले होते. त्यानुसार खातेधारक वसिम शेख यांची गोल्ड लोनची दोन खाती तपासण्यात आली. यात 221 ग्रॅम वजनाचे सहा दागिने बनावट आढळून आले. त्याव्दारे नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीची दोन लाख 78 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. सदर बनावट सोने तारण ठेवण्याकरीता अजय कपाले, सुनील आळकुटे, श्रीतेश पानपाटील व संदीप कदम यांनी दिल्याचे व त्यांच्या सांगण्यावरून ते तारण ठेवल्याचे खातेदारक शेख यांनी सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अजय कपाले याच्यासोबत सुनील आळकुटे, श्रीतेश पानपाटील व संदीप कदम हे नेहमी संस्थेत येत होते व त्यांचे देखील सोने तारण खाते असून ते तारण खाते व्हॅल्युअर अजय कपाले याने तपासणी केलेले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना या गुन्ह्यात वर्ग करून ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. नागेबाबा सोसायटी मधील इतर कर्ज खात्यांची तपासणी सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या