Wednesday, April 24, 2024
Homeनगरआश्वासनानंतर नगरपरिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

आश्वासनानंतर नगरपरिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषद कर्मचार्‍यांचे दुसरे थकीत वेतन 30 नोव्हेंबरपर्यंत करणार व तिसरे थकीत वेतन 15 डिसेंबरपर्यंत करणार

- Advertisement -

तसेच वेतनाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांवर आकसापोटी कुठलीही कारवाई करणार नाही. या आशयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ यांच्या लेखी आश्वासनानंतर वंचित बहुजन आघाडी प्रणित नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने सुरू असलेले आंदोलन पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले.

शेवगाव नगरपरिषद कर्मचार्‍यांचे 4 महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, कोव्हिडच्या काळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळावा, नगरपरिषद कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करावी. आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 9 नोव्हेंबरपासून वंचित बहुजन आघाडी प्रणित नगरपरिषद कामगार संघटनेने आंदोलन सुरू केले होते.

9 तारखेला सर्व कामगारांनी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या देऊन धरणे आंदोलन केले. तसेच नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. नगरपरिषद प्रशासन व पदाधिकार्‍यांनी दोन दिवस उलटूनही या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे तिसर्‍या दिवशी म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी मतदारसंघाच्या भाजपच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानासमोर ‘थाळी नाद’ आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आखेगाव रोडवरील गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याजवळ अडविले व प्रमुख पदाधिकार्‍यांना अटक केली.

तिसर्‍या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कर्मचार्‍यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर दिवे लावा आंदोलन केले. तर पाचव्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत नगरसेविका सुनीता दहिवाळकर, नगरसेवक अरुण मुंडे, उमर शेख, सागर फडके, अशोक आहुजा, उपनगराध्यक्ष वजीर पठाण व माजी नगराध्यक्षा विद्याताई लांडे यांच्या निवास्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन केले.

दुपारी 2 वाजता शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी या आंदोलनस्थळी येत यशस्वी समन्वय साधला. पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ यांनी प्रा. किसन चव्हाण तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात यांच्याशी चर्चेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनास भाकपचे संजय नांगरे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, विनोद ठाणगे, गणेश डोमकावळे, अमोल देवढे, प्रवीण म्हस्के, अशोक भोसले तसेच रिपाइंचे सुनील आहुजा आदींनी या आंदोलनास सक्रिय सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. चर्चेच्यावेळी नगरसेवक अशोक आहुजा, सागर फडके, विनोद मोहिते आदी उपस्थित होते.

आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अन्सार कुरेशी, सलीम जिलानी, राजू शेख, सुरज मोहिते, भानुदास गायकवाड, लक्ष्मण मोरे, आप्पासाहेब मगर, विशाल इंगळे, लखन घोडेराव, रेश्मा गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेच्या कामगारांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या