खात्यांचे होणार फॉरेन्सिक ऑडीट

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गायकवाड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गायकवाड याच्याशी संबंधित कर्ज खात्यातील रकमा कोणाच्या खात्यात गेल्या याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी बँकेच्या श्रीगोंदा व जालना शाखेत जाऊन तपासणी केली आहे. दरम्यान, या सर्व पैशांच्या देवाण घेवाणीचे फॉरेन्सिक ऑडीट करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या-ज्या खात्यांमधून या रकमा हस्तांतरीत झाल्या, त्यांचीही चौकशी होणार आहे.

बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड करत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे तपासी अधिकारी आव्हाड यांनी सांगितले.

गायकवाडच्या कोठडीतील तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या होत्या. थकीत कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. तसेच, कर्जाच्या रकमेचा गैरवापर होत असताना व सदर रकमा दुसर्‍या खात्यात वर्ग करताना संबंधित कर्जदारांच्या सह्या नसल्याचे समोर आले होते.

आता या रकमा ज्यांच्या खात्यात वळवण्यात आल्या, ते सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. गायकवाड याच्या खात्यातून काही रक्कम इतर व्यक्तींच्या खात्यात गेली आहे. वेगवेगळ्या खात्यातून या रकमा फिरवत शेवटी ज्या व्यक्तीपर्यंत रक्कम गेली, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या गुन्ह्याशी संबंधित इतर काहींच्या मागावर पोलीस असून, लवकरच आणखी काही जणांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

सुमारे 32 कोटींची वसुली

थकीत कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी दुसरे कर्ज करून त्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. गायकवाड याचे नावे बँकेने सुमारे 17.50 कोटी रुपये कर्ज दिले होते. आता त्याच्याकडून सुमारे 32 कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे. दरम्यान फक्त दोन कोटी रूपये व्हॅल्युएशन असलेल्या मालमत्तेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज देणारे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *