Monday, April 29, 2024
Homeनगर... तर, खातेदारांची कुटुंबियांसह आत्महत्या !

… तर, खातेदारांची कुटुंबियांसह आत्महत्या !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील 2 ते 3 वर्षे करोना महामारीमुळे व्यवसायाचे व कुटुंबाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नगर अर्बन बँकेतील करंट व सेव्हींग अकाउंटमधील आमच्या देय व जमा रक्कम मिळणे गरजेचे आहे. ते मिळाले नाही तर आमच्यावर कुटुंबियांसह आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, असा उद्वेग नगर अर्बन बँकेच्या कर्जतमधील व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेतील सेव्हींग व करंट रकमा मिळण्यासाठी 5 जुलैपासून नगरमधील बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या व्यापार्‍यांनी दिला आहे. त्यांची सुमारे 10 कोटींची रक्कम या खात्यात अडकून पडली आहे.

- Advertisement -

कर्जतमधील महेश सूर्यकांत जेवरे व कर्जत तालुक्यातील काही व्यापार्‍यांनी अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे. त्यांचे सुमारे 10 कोटींवर रुपये बँकेत अडकले आहेत. रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर निर्बंध लावल्याने करंट वा सेव्हींग खात्यातून सहा महिन्यांतून एकदाच व तेही 10 हजारापर्यंतचीच रक्कम काढता येते. मात्र, कर्जतमधील व्यापार्‍यांची लाखो रुपयांची अशी रक्कम त्यांच्या या बँकेतील करंट व सेव्हींग खात्यात पडून आहे. या खात्यांवरील व्यवहार बँकेने निर्बंधांमुळे बंद केल्याने या व्यापार्‍यांना या खात्यात पडून असलेली रक्कम अन्य व्यापारी व्यवहारासाठी देता येत नाही वा बाहेरून कोणी यांच्या व्यापारी व्यवहारापोटी यांच्या खात्यात टाकलेले पैसेही यांना काढता येत नाही.

पैसे असूनही व्यवहार करता येत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी स्थिती या व्यापार्‍यांची झाली आहे. यासंदर्भात या व्यापार्‍यांपैकी महेश जेवरे यांच्यासह अतुल कोठारी, प्रफुल्ल नेवसे, अशोक सुपेकर, कल्याण काळे, रविकिरण नेवसे, प्रतापकुमार शहा, महादेव जगताप, भीमराव काळे, ताराबाई जगताप, देवदत्त जगताप, प्रसाद शहा, नानासाहेब शिंदे, चेनसुख पितळे, सुनील कोठारी, बाबालाल कोठारी, कल्पेश कोठारी, सुनील भालेराव, संदीपान सुपेकर आदींसह अन्य काही व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवेदन दिले आहे.

यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेची शाखा कर्जत व मिरजगाव येथे असून या बँकेवर डिसेंबर 2021 पासून रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध लावले आहे व त्यामुळे बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. याप्रकरणी रिझर्व बँक व संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दोषी पदाधिकारी, कर्मचारी तसेच थकबाकीदार यांच्या कठोर व ठोस अशी कोणतीही कारवाई होत नाही, तसेच बँकेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने या प्रकरणात जबाबदारी टाळण्यासाठी हेतुपुरस्पर विलंब केला जात आहे.

त्यामुळे आम्हा अर्जदारांची फसवणूक होऊन आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नगर अर्बन बँकेच्या अहमदनगर येथील मुख्य शाखेसमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. त्यानंतर होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी आपल्यावर राहील, असा इशाराही या खातेदारांनी बँकेच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या