Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनगर टाइम्स संवाद कट्टा : पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच...

नगर टाइम्स संवाद कट्टा : पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच…

‘नगर टाइम्स-सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमाच्या गप्पाष्टकात ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले आणि स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्याशी नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक यांनी शहराच्या राजकीय आणि विकासाच्या मुद्द्यांवर साधलेला संवाद . कट्ट्यावरील त्या गप्पांत आगामी राजकीय वाटचालीची दिशाही स्पष्ट केली…! तर पाहुयात काय म्हणालेत पाहुणे…

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नगरमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष असला तरी समविचारी नगरसेवक सोबत असल्याने पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच होईल, असा दावा ज्येष्ठ् नगरसेवक गणेश भोसले यांनी केला आहे. महापालिकेतील कर्तबगार कर्मचार्‍यांना बक्षीस म्हणून रोख स्वरूपात रक्कम देऊन गौरव केला जाणार असल्याचे सभापती घुले यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जूनमध्ये महापालिका महापौर पदाची निवडणूक होणार आहे. अनुसुचित जाती महिलेसाठी महापौर पद राखीव आहे. भाजप वगळता इतर सगळ्यांकडेच महापौर पदाचे उमेदवार आहेत. सर्वाधिक 23 नगरसेवक असूनही महापालिकेत शिवसेना विरोधी बाकावर आहे. राज्यातील सत्ता समीकरण पाहता आता महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संधी मिळेल अशी चर्चा असतानाच भोसले यांनी राजकीय बॉम्ब टाकला आहे.

महापालिकेत राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक असले तरी समविचार नगरसेवक सोबत असल्याने शिवसेनेपेक्षा जास्त संख्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे काही झाले तरी महापौर राष्ट्रवादीचाच होईल, असा दावा करताना भोसले यांनी पक्षश्रेष्ठीचा निर्णय मात्र अंतिम असेल असं स्पष्ट केलं. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सांगत त्यांनी पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी शहर विकासाबाबत सांगताना वसुलीवर भर दिला असल्याचे सांगितले. जे कर्मचारी वसुलीत कर्तबगारी करतील त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. नव्याने मालमत्ता शोधण्यासाठी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जाईल. शहराचा विस्तार होत असल्याचे सांगतानाच ते विकासाचं द्योतक असल्याचे घुले यांनी स्पष्ट केले.

शॉपिंग सेंटर, हॉस्पिटल उभारणारच

शहरातील गंजबाजार, चितळे रोडवरील नेहरू मार्केटच्या जागेत आणि सावेडीतील मनमाड हायवेकडेला असलेल्या एनसीसी कार्यालयाच्या जागेवर शॉपिंग सेंटर आणि सावेडीत हॉस्पिटल उभारणारच, असं संकल्प सभापती घुले यांनी चर्चेत केला. रस्ते, पाणी, वीज या नेहमीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणू असेही घुले यांनी स्पष्ट केले.

भाजप-राष्ट्रवादीची सोयरीक मोडणार ?

पुढचा महापौर राष्ट्रवादीचा झाला तर विरोधी बाकावर कोण असेल, शिवसेना की भाजप? या प्रश्नांवर भोसले यांनी भाजप असे उत्तर दिले. आजमितीला सोबत असलेल्या भाजपला पुढच्या राजकारणात विरोधकाची भूमिका बजावावी लागेल असे स्पष्ट करत भोसले यांनी भाजप-राष्ट्रवादीची सोयरीक मोडणार असल्याचे संकेत दिले.

आ. जगताप सर्व पक्षाचे मास्टर…

शहरात सर्वच पक्ष आ. जगताप चालवितात, अशी चर्चा आहे. या प्रश्नावर भोसले यांनी असं काही नाही, असे उत्तर देताना आ. संग्राम जगताप हे विकासाच्या मुद्द्यावर नगरसेवक कोणत्या पक्षाचा हे पाहत नाही. सगळेच त्याच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर येतात. सर्वाना सोबत घेऊन विकास कामे करण्याचा आमदार जगताप यांचा स्वभाव आहे. सगळ्याच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. याचा अर्थ ते सगळेच पक्ष चालवितात असा होत नाही, असे स्पष्ट करताना भोसले यांच्या चेहर्‍यावरचे हासू मात्र लपून राहिले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या