Friday, April 26, 2024
Homeनगरनगर दक्षिणेत करोनाने केले हैराण

नगर दक्षिणेत करोनाने केले हैराण

पारनेर तालुक्यात गुरुवारी आठ करोना पॉझिटिव्ह

सुपा|वार्ताहर|Supa

- Advertisement -

पारनेर तालुक्यात करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवारी दिवसभरात आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात रॅपीड टेस्टचे सहा अहवाल आले आहेत तर एक अहवाल खाजगी लॅबचा व एक अहवाल सरकारी लॅबचा आहे.

यात कान्हूरपठार गावचे तीन, पाडळी दर्या दोन, सुपा एक, ढवळपुरी एक व टाकळी ढोकेश्वर एक अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यानी दिली.

पारनेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळपर्यत 41 अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण असून गुरुवारी दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. तपासणीसाठी बुधवारी (दि. 29) 22 तपासणी अहवालाची प्रतीक्षा होती. गुरुवारी (दि. 30) आणखी स्त्राव तपासणीसाठी पाठविले असेही डॉ. लाळगे यांनी सांगितले.

सुप्यासह पारनेर तालुक्याचा एकंदरीत आभ्यास करता बरेच काही स्पष्ट होते. पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी रुग्णंच्या संपर्कातील 100 मीटरचा परीसर ताबडतोब सील करण्याचे आदेश दिले आहेत.

शेवगाव शहरात सात जण करोना बाधित तर 53 जणांची मात

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgav

गुरुवारी (दि. 29) करण्यात आलेल्या 67 रॅपिड टेस्टमध्ये 7 जणांना करोनाची लक्षणे आढळून आली तर 60 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे शेवगाव तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 84 झाली असून आतापर्यंत 53 जणांनी करोनावर मात केली असून 30 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

शेवगाव शहरामध्ये करोना बाधितांची संख्या निवदेंदिवस वाढत चालली आहे. आज गुरुवारी 67 संशयितांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाईकवाडी मोहल्ला येथे 50 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण असे 2, इंदिरानगर येथे 39 वर्षीय पुरुष, म्हसोबानगर येथे 36 वर्षीय पुरुष, श्रीराम कॉलनीमध्ये 43 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथे 44 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय मुलगी असे एकूण सात करोना बाधित आढळून आले.

शहरासह तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 84 झाली असून यापैकी 53 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 30 जणांवर शेवगाव, संगमनेर व नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील सहा जण बाधित

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

शहरातील चार कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 108 जणांच्या केलेल्या तपासणीत आठ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले; तर नंतर 11 जण पॉझिटिव्ह निघाले असून जामखेड शहर 14, पिंपरखेड 3, फक्राबाद 1, डोणगाव 1 असे एकूण तालुक्यात 19 जण पॉझिटिव्ह निघाले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. शहरात काल दिवसभरात एकाच दिवशी तब्बल 18 तर गुरुवारी 11 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या तालुक्यातील एकूण संख्या 19 झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर काल 29 रोजी दुपारी जामखेड शहरातील एक खाजगी डॉक्टर व बँक मॅनेजरसह एकूण चार जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली होती. शहरातील रमेश खाडे नगर, बीड रोड, राळेभात गल्ली व गोरोबा टॉकीज जवळ हे रुग्ण आढळून आले. चार रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत संपर्कात आलेल्या तब्बल 108 जणांची करोना तपासणी केली होती.

या तपासणीत पुन्हा एकच कुटुंबातील सहा तर इतर दोन असे एकूण आठ जण रात्री करोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर दिवसभरात शहरात एकूण 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली. तसेच काल दि. 30 रोजी सकाळी पुन्हा राळेभात गल्ली येथील महिला तर फक्राबाद येथील 1, पिंपरखेड येथील 3, डोणगाव 1 असे जामखेड तालुक्यात एकूण 19 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जामखेड शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आता प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे; मात्र जामखेड शहरात लॉकडाऊन पडणार का नाही याबाबत प्रशासनाकडून अद्याप माहिती मिळाली नाही. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडल्यास तोंडाला मास्क वापरावे, जवळ सॅनिटायझर ठेवावे, गर्दीत जाणे टाळावे, काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी जनतेला केले आहे.

कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 करोना बाधित

कर्जत|वार्ताहर|Karjat

करोना मुळे कर्जत शहरातील 71 वर्षे वय असलेल्या व्यक्तीचे गुरुवारी (दि. 30) निधन झाले. शहरातील हा दुसरा बळी असून तालुक्यामध्ये एकूण करोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या पाच झाली आहे.

कर्जत तालुक्यामध्ये गुरुवारी दिवसभरामध्ये 24 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 87 झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.

ग्रामीण भागामध्ये करोनाचा झपाट्याने विळखा पडू लागला आहे. राशीनमध्ये करोनाचे 14 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण हे राशीन परिसरामध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे राशीनचे करोना संक्रमण कसे रोखायचे ही प्रशासनाची आता डोकेदुखी झाली आहे.

कर्जत तालुक्यातील कुळधरण व कापरेवाडी नागापूर या तीन गावांमध्ये काल करोनाने शिरकाव केला आहे. कुळधरण येथे दोन, कापरेवाडी येथे दोन व नागपूर येथे एक करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागामध्ये याचा प्रसार रोखणे गरजेचे ठरले आहे. कर्जत शहरामध्ये करोनाची साखळी तुटली असे वाटत असतानाच काल शहरांमध्ये पुन्हा एकदा नवीन तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीला पुन्हा या ठिकाणी करोना रोखण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.

राशीन 14, कर्जत 3, कुळधरण 2, कापरेवाडी 2, पिंपळवाडी 2, नागापूर 1, तालुक्यामध्ये 60 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 79 परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या