नगरचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख कोरगावकर यांची उचलबांगडी

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यस्तरीय शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या वादंगापेक्षा नगर जिल्ह्यातून दक्षिण नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांना हटवा असा आक्रमक नारा देणार्‍या शहर व जिल्हा शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्‍यांचे साकडे अखेर पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐकले व नगर दक्षिणेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हाती नारळ देण्यात आला. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर उत्तर नगर जिल्ह्यात नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली आहे.

राज्यस्तरीय शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंसह 40आमदारांनी स्वतंत्र गट केल्याने मुख्यमंत्रीपदाचा ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दोन्ही गटांकडून राज्यभरातील शिवसेना पक्षावर दावे-प्रतिदावे सुरू झाले. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील काही नगरसेवक शिंदे गटात सहभागी झालेतर बहुतांशजणांनी ठाकरेंच्या पाठिशी राहणे श्रेयस्कर मानले. यासाठी नगरला ठाकरे समर्थनासाठी मेळावाही घेतला गेला व याच मेळाव्यात संपर्क प्रमुख कोरगावकर यांना तातडीने हटवण्याची मागणी झाली.

एवढेच नव्हे तर या मेळाव्यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या 16 बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जात असतांना त्यात संपर्क प्रमुख कोरगावकरांचाही फोटो टाकून त्यांच्या विषयीचा रोष प्रगट केला गेला. त्यानंतर युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी शिवसंवाद यात्रेनिमित्त शिर्डीला आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन कोरगावकरांविषयी तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी ठाकरे यांनी त्यांना मुंबईला येण्याचे सांगून अनुकूल निर्णय करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर राठोड यांच्यासह योगीराज गाडे, अभिषेक कळमकर, अशोक दहीफळे आदींनी मुंबईत जाऊन आदित्य ठाकरेंशी चर्चा केली व त्यानंतर आठवडाभरातच कोरगावकर यांची नगरच्या संपर्क प्रमुख पदावरून उचलबांगडी झाली.

नियुक्तीपासूनच तक्रारी

नगरचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड हयात असताना 7-8 वर्षांपूर्वी कोरगावकर यांची नगरच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या नियुक्तीपासूनच त्यांच्याविषयीच्या तक्रारी पक्ष श्रेष्ठींकडे होत होत्या. शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व माजी आमदार राठोड यांनी चार-पाच वेळा पत्रे पाठवून त्यांना हटवण्याची मागणीही केली होती. पण शिवसेनेतील मिलिंद नार्वेकरांसह अन्य काही नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांच्या विरोधातील तक्रारींची फारशी दखल घेतली गेली नाही, असे सांगितले जात आहे. नगर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीशी असलेली त्यांची जवळीक पाहून अनेकांना शिवसेनेला फटका बसण्याची जाणीव होत होती. पणश्रेष्ठींनी त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे नगर शहरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दोन वेळा पराभव झाला व पक्षांतर्गत गट-तट निर्माण करण्यास त्यांनी चालना दिल्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. तसेच राष्ट्रवादीशी असलेल्या संबंधांमुळेच राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानांही मनपा स्थायी समितीच्या दोन सभापती निवडीच्यावेळी शिवसेनेच्या योगीराज गाडे व विजय पठारे यांना माघार घ्यावी लागली व भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर व अविनाश घुले यांना पाठिंबा द्यावा लागला. मनपातील सभागृह नेतेपदाच्या नियुक्तीतही गणेश कवडे व अनिल शिंदे यांच्यात त्यांच्या मुळेच वाद झाला. वर्षभरापूर्वी महापौर निवडीच्या वेळीही रोहिणीताई शेंडगे यांना पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागला, असे आवर्जून सांगितले जात आहे. दक्षिण नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असताना जामखेड, कर्जत, पारनेर, नगर शहर व श्रीगोंदे तालुक्यात शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांचे दोन गट पडले, परस्परांविषयी अविश्वासाचे वातावरण राहिले. परिणामी, या तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेला फटका बसला. नगर तालुक्यात मात्र कोरगावकरांनी अनेकांना जिल्हा प्रमुख पदाचे आमीष दाखवले, पण त्यांनी ते नाकारल्याने नगर तालुक्यात शिवसेना एकसंध राहिली.

दोन नव्यांवर नवी जबाबदारी

नगर दक्षिण जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी आता मुंबईचे आ. सुनील शिंदे यांची व उत्तर नगर जिल्ह्याला नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप यांची नियुक्ती केली गेली आहे. आ. शिंदे हे वरळीचे आमदार होते व त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभेला स्वतः उमेदवारी केली नाही. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले गेले. तर शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना शह देण्यासाठी व भविष्यातया मतदारसंघाचे सेनेचे उमेदवार म्हणून माजी मंत्री घोलप यांना उत्तरेत संपर्क प्रमुख नेमले गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्याच्या ठाकरे-शिंदे यांच्या रस्सीखेचीतनगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला नव्याने उभारी देण्याची जबाबदारी आ. शिंदे व घोलप यांच्यावर आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *