Friday, April 26, 2024
Homeनगरनगर-शिर्डी रस्त्याचे मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूमीपूजन

नगर-शिर्डी रस्त्याचे मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूमीपूजन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-शिर्डी रस्त्यासाठी 500 कोटी रूपये मिळाले असून 1 मार्चला टेंडर होऊन त्यानंतर लगेचच त्याचे कामही सुरू होणार आहे.

- Advertisement -

नगर-मनमाड रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला, पण निधी मिळाला नाही. केंद्र सरकारने मात्र भरभरून निधी दिल्याचे माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याचेही खा. डॉ. विखे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी मिळालेल्या निधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे उपस्थित होते. खा. डॉ. विखे म्हणाले, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे हा अनेक दिवसांपासूनचा प्रश्न आहे. या संदर्भात रेल्वेने कामही हाती घेतले आहे.

मात्र तो प्रश्न सुटलेला नाही. नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी यासाठी संसदेच्या 8 मार्चपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात हा प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून आणणार आहे. ही इंटरसिटी रेल्वे सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच ती सुरू होईल असा आशावाद खा. विखे यांनी व्यक्त केला.

लोकसभा मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांची कामे आता मार्गी लागली आहेत. आता साकळाई, कुकडीसारख्या पाणी प्रश्नाकडे लक्ष दिले जाणार आहे. नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेल्या अडचणी खा. डॉ. विखे यांनी दूर केल्याने उड्डाणपुलाचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्याचे सांगत शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी श्रेय खा. विखे यांना दिले.

निवडणुकांच्या तोंडावर कोणत्याही कामाचे भूमिपूजन केले जाणार नाही. विकासाची कामे खासदारकीच्या पहिल्या चार वर्षांतच पूर्ण करून त्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जाईल. मतांवर डोळा ठेवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याच कामाचे भूमिपूजन केले जाणार नाही. मार्चमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अणि त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना नगरला आणले जाणार आहे. नगरमधील के.के.रेंज आणि व्हीआरडीई प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संरक्षण मंत्री नगरला आणणार असल्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या