Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर, राहुरी, घोडगावामध्ये कांद्याची साठेबाजी ?

नगर, राहुरी, घोडगावामध्ये कांद्याची साठेबाजी ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कांदा व्यापार्‍यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तसेच साठेबाजीच्या संशयावरून काही दिवसांपूर्वी

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बड्या कांदा व्यापार्‍यांवर धाडी टाकण्यात आल्या. मात्र, ज्या नाशिकनंतर कांद्याचा आगार म्हणून नगर जिल्ह्याकडे पाहिले जाते, त्या जिल्ह्यातील व्यापार्‍यांकडील कांदा साठवणुकीकडे जिल्हा प्रशासन आणि अन्य संबंधीत विभागाचे डोळेझाक झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात नगर शहर, राहुरी, घोडेगाव आणि अन्य ठिकाणी व्यापार्‍यांनी कमी भावात शेतकर्‍यांकडून कांदा घेवून त्याची साठवणूक करून ठेवली असून भाव वधारल्यानंतर चढ्या दरात कांदा विक्री सुरू असल्याची माहिती सुत्रांना दिली.

काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. यात या व्यापार्‍यांचे मागील पाच वर्षापूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाचे कागदपत्रे तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली असल्याची माहिती पडताळण्यात आली. वाढलेले भाव, अतिवृष्टीने झालेले कांद्याचे नुकसान, नविन कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तुट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे.त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापार्‍यांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी नाशिक जिल्ह्यात करण्यात आली.

देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी कांदा साठवणुकीवरही नियंत्रयण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीकडून कांद्या आवक, विक्री आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागविण्यात येऊन कांद्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, नगर जिल्ह्यात असे काहीही होतांना दिसत नाही.

जिल्ह्यात आजही अनेक तालुक्यात बडे कांदा व्यापारी असून त्यांचा कांदा हा उत्तर आणि दक्षिण भारतात पाठविण्यात येत आहे. उन्हाळी कांदा निघाल्यानंतर शेतकर्‍यांनी आर्थिक निकड म्हणून व्यापार्‍यांना कमी दरात विकला. याच कांद्याची साठवणूक करून जिल्ह्यातील व्यापारी आता चढ्या दराने कांदा विक्री करत आहेत. मात्र, या प्रकाराकडे जिल्ह्यातील प्रशासन डोळे बंद करून आहे.

नगर जिल्ह्यात नगर शहर, राहुरी तालुक्यातील काही गावांसह नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी बडे कांदा व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांच्या गोदामात आजही शेकडो गाड्या कांदा साठवणूक करून ठेवलेली आहे. अनेक ठिकाणी व्यापारी भाव वाढ होताच स्वत:चा कांदा शेतकर्‍यांचा भासवून त्याची जादा दराने विक्री करून नफेखोरी करत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यापार्‍यांचे चांगलेच फावले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत बाजार समित्यामध्ये कांदा आवकमध्ये व्यापार्‍यांनी विकत घेतलेला कांदा आणि त्यानंतर जिल्ह्या बाहेर केलेली विक्री याची तपासणी आवश्यक आहे. यासह व्यापार्‍यांची असणारी गोदामे याची तपासणी करून त्याठिकाणी कोणत्या शेतकर्‍यांकडून किती कांदा विकत घेतला, याच्या तपशीलाची पडताळी होणे आवश्यक आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यात व्यापार्‍यांचा कांदा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने धाडस करणे गरजेचे बनले आहे.

शिवार मापामुळे शेतकर्‍यांना गंडा

नगर जिल्ह्यात बाजार समितीसोबतच कांदा विक्रीसाठी शिवार माप देण्याची मोठी पध्दत आहे. या ठिकाणी व्यापारी शेतकर्‍यांच्या शेतात जावून कांद्याचे भाव निश्‍चित करून वजानानूसार त्याला कांदा विक्रीचे पैसे देतात. मात्र, हा व्यवहार तोंडी आणि विश्‍वासावर असल्याने शेकडो शेतकर्‍यांना त्याचा फटका बसलेला आहे. व्यापारी कांदा घेवून गेल्यानंतर शेतकर्‍यांना पैसेच देत नाहीत अथवा दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंडवली जात आहेत. गंडा घातलेली कांद्याची रक्कम ही काही कोटींमध्ये असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे शिवार मापावर बंदी आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या