Friday, April 26, 2024
Homeनगरनगर, पारनेरमध्ये सर्वाधिक कांदा पिकाची लागवड

नगर, पारनेरमध्ये सर्वाधिक कांदा पिकाची लागवड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात सध्या 44 हजार 555 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात अद्याप अनेक तालुक्यांत पावसाच्या पाण्याचा वाफसा झालेला नाही. यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झालेली नाही. असे असतांना खर्चीक असणार्‍या कांदा पिकाची नगर आणि पारनेर तालुक्यात सर्वाधिक लागवड झालेली आहे.

- Advertisement -

कधी शेतकर्‍यांच्या तर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार्‍या कांद्याची गोडी सर्वांनाच असते. कांदा पीक म्हणजे मोठे खर्चिक पीक, लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाला पैशाची गरज असते. त्याच सोबत विविध किटक नाशके, कांदा फुगविण्यासाठीचे टॉनिक यांचा मुबलक मारा केल्यानंतर कांद्याला भाव मिळाला, तर शेतकर्‍यांचा पैसा वसूल अन्यथा भाव न मिळाल्यास शेतकर्‍याला खिशाला कात्री लागण्याची वेळ येते. असे असताना शेतकर्‍यांचा कांदा लागवडीकडे मोठा कल असतो. कांदा पिकाची लॉटरी लागली तर शेतकर्‍यांचे भविष्यच बदलते. मात्र, हे कधीतरीच घडते.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कांदा लागवडीत सर्वाधिक पारनेर तालुक्यात 16 हजार 548 हेक्टर क्षेत्र असून त्या खालोखाल 16 हजार 84 हेक्टर क्षेत्र हे नगर तालुक्यात आहे. श्रीगाेंंदा तालुक्यात 8 हजार 277 हेक्टर तर पाथर्डी तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर कांदा पिकाचे क्षेत्र आहे. उर्वरित तालुक्यात कांदा पिकाचे लागवडीचे क्षेत्र कमी अथवा नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात आहे.

दिवाळीच्या दरम्यान गावरान कांदा लागवडी सुरू होतात. हा कांदा उन्हाळ्यात तयार होत असून त्याला फारसा भाव मिळत नाही. मात्र, उत्पादन चांगले निघत असून शेतकरी कमी भाव असल्यास हा कांदा साठवून ठेवतात आणि पावसाळ्यात भाव वाढ झाल्यावर कांदा विक्रीसाठी काढतात.

सध्या कांदा पिकासाठी एकरी साडेसात ते आठ हजार रुपये लागवड दर आहे. विशिष्ट भागातील टोळ्या या कांदा लागवडीसाठी प्रसिध्द असून लागवडीवरच कांदा पिकाचे उत्पादन अवलंबून असल्याने लागवड करणार्‍यांना मोठी मागणी आहे. यासह घरचे रोप असल्यास कांदा पीक परवडते. रोप विकत घेऊन कांदा लागवडी जोखीम घेतल्यासारखे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या