Friday, May 10, 2024
Homeनंदुरबारनगरपालिकेच्या हिताविरुद्ध वागल्याने विरोधी नगरसेवकांवर कारवाईचा दावा करणार

नगरपालिकेच्या हिताविरुद्ध वागल्याने विरोधी नगरसेवकांवर कारवाईचा दावा करणार

नंदुरबार । दि.23। प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबारच्या नगराध्यक्षा या एका इज्जतदार खानदानातील आहेत. त्यांच्यात हिंमत नाही पण इज्जत नक्कीच आहे. निवडणूका संपल्या की विरोध संपलेला असतो. त्यामुळे प्रत्येक चांगल्या विकास कामात राजकारण न करता विरोधकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, नगरपालिकेच्या हिताविरुद्ध वागल्याने विरोधी नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत लवकरच दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी श्री.रघुवंशी यांनी सांगितले.

दि.16 ऑक्टोबर रेाजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत नगरपालिकेने व्यापारी गाळयांना तीन महिन्यांचे घरभाडे माफ व नागरिकांना मालमत्ता करात 10 टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, याबाबत भाजपाचे नगरसेवक व नेत्यांनी सहा महिन्यांची घरपट्टी माफ केल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन करणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावले होते. मात्र, घरपट्टी माफ करण्यात आल्याचा कुठलाही ठराव सभेत झाला नसल्याने विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणारे फलक शहरात लावल्याने सदर बॅनर काढून टाकावे, अन्यथ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी दिला होता.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट असल्याने मालमत्ता कर आकारणी आणि गाळ्यांची भाडे आकारणी 6 महिन्यापर्यंत माफ करावी, अशी मागणी भाजपाने केली होती. म्हणूनच पालिकेने तसा ठराव मंजूर केला आहे.

मात्र भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधार्‍यांनी शब्द फिरवला आहे. म्हणून ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेतील या ठरावाविषयीचे फुटेज जनतेसमोर मांडून ‘दूध का दूध पानी का पानी’ करून दाखवावे तसेच हिंमत असेल तर शहरात लावलेले बॅनर काढून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी दिले होते.

याबाबत आज दि.23 रोजी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात श्री.रघुवंशी म्हणाले, नगरपालिकेची नुकतीच सभा घेण्यात आली. त्यात सर्व विषय जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी होते.

त्यामुळे विरोधकांना कुठल्याही विषयाला विरोध करण्यास संधी नव्हती. म्हणून त्यांनी जे पालिकेत घडलेच नाही त्याचा मुद्दा बनवला व जनतेची दिशाभूल केली. नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी या शहराच्या कन्या आहेत, एका इज्जतदार खानदानातील सून आहेत.

त्यांच्यात हिंमत असेल तर बॅनर काढून दाखवावे, असे आव्हान विरोधक देतात, ही गोष्ट अशोभनीय आहे. आम्हाला अशी भाषा कधी येत नाही आणि येणारही नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. नगराध्यक्षांमध्ये हिंमत नाही पण इज्जत नक्कीच आहे.

निवडणूका संपल्या की विरोध संपवायचा असतो व विकासाला साथ द्यायची असते. परंतू नगरपालिकेत प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची परंपराच सुरु झाली आहे. खोटे बोलून राजकारण करणे ही भाजपाची परंपराच आहे.

घरपट्टी माफ करण्याचा अधिकार पालिकेला नाही पण जे सभेत घडलेच नाही त्याबाबत दोन पाचशे रुपयांचे बॅनर लावले म्हणजे आपण सतीसावित्री आहात असे होत नाही. सभेत सर्व विषय बहुमताने करण्यात आले आहे.

याचा अर्थ विरोधकांनी घरपट्टी नुतनीकरण न करणे, 10 टक्के घरपट्टी सुट करणे, दुकानांचे भाडे माफ करण्यालाही विरोध दर्शविला आहे, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

पालिकेच्या नुतन इमारतीचे लवकरच भुमिपूजन

नंदुरबार नगरपालिकेच्या नव्या अद्यावत इमारतीचे ई-भुमिपूजन मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दसर्‍याच्या आधी करण्याचा प्रयत्न आहे. परंतू काही अडचणी आल्यास दसर्‍यानंतर लगेचच हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. येत्या दीड वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. परंतू या इमारतीचे काम दिलेल्या ठेकेदारालाही दमदाटी करुन काम वेळेत पूर्ण होवू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

महिलांच्या जीमचे लवकरच उद्घाटन

नंदुरबार पालिकेने महिलांसाठी अद्यावत जीम तयार केली आहे. परंतू सध्या जीमला शासनाने परवानगी दिलेली नसल्याने त्याचे उद्घाटन बाकी आहे. यासाठी जीमच्या उद्घाटनासाठी शहरातील महिला लोकप्रतिनिधी, महिला अधिकारी यांना बोलावण्यात येणार आहे.

माँ बेटी गार्डनचे काम दोन महिन्यात पूर्ण करणार

शहरातील ट्रक टर्मिनसजवळ माँ बेटी गार्डने काम प्रगतीपथावर असून येत्या दोन महिन्याचे त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या गार्डनमध्ये 10 थोर महिलांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यात जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, झाशीची राणी, मेरी कोम, प्रतिभाताई पाटील, स्मिता पाटील, आनंदीबाई जोशी आदींचा समावेश राहणार आहे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल

नगरपालिका निवडणुकीत शहरात 50 बेडचे अद्यावत हॉस्पीटल उभारण्याचे आश्वासन आपण दिले होते. सदर हॉस्पीटल हे जेपीएन रुग्णालयात सुरु करण्यात येणार होते. परंतू नगरपालिकेच्या इमारतीचे काम रखडल्याने हा विषय प्रलंबित आहे. परंतू येत्या काही दिवसात पालिकेचे रुग्णालयात झाले तर ठिक नाही तर आमच्या रघुवंशी मेडीकॉन या संस्थेच्या माध्यमातून ट्रक टर्मिनलसमोर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येईल, ज्यात दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत होतील, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

24 बाय 7 नळपाणीपुरवठयाचे काम अंतीम टप्प्यात

नंदुरबार शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचे काम अंतीम टप्प्यात आहे. यासाठी वॉटर ऑडीट व एनर्जी ऑडीटचे काम सुरु आहे. कोल्हापूरच्या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. या एजन्सीचे लोक शहरात फिरुन नळ कनेक्शनची माहिती गोळा करतील, नागरिकांनी आपल्या कडे असलेल्या नळ कनेक्शनची खरी माहिती द्यावी, ज्यांच्याकडे बेकायदेशीर नळ कनेक्शन आहे, तेदेखील कायदेशीर करण्यात येतील, फक्त एक वर्षाची नळपट्टी त्यांना भरावी लागेल, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

सभेचे फुटेज दाखवले

दरम्यान, सहा महिन्यांची घरपट्टी माफ केल्याचा ठराव नगरपालिकेने केला असून या सभेचे फुटेज नागरिकांना दाखवून दूध का दूध पानी का पानी का पानी करावे, असे आव्हान भाजपाचे नेते डॉ.रविंद्र चौधरी यांनी दिले होते. याबाबत माजी आ.रघुवंशी यांनी नगरपालिकेच्या सभेचे संपुर्ण फुटेज पत्रकारांना दाखवले व यात घरपट्टी माफ करण्याबाबत कुठलाही ठराव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या सभेचा अजेंडा 8 ऑक्टोबरला काढण्यात आला होता. त्यानंतर 12 ऑक्टोबरला विरोधी पक्षाचे गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी नगराध्यक्षांना पत्र देवून व्यापारी संकुलांचे भाडे तीनऐवजी सहा महिन्यांचे माफ करावे तसेच मालमत्ताधारकांना सहा महिन्यांची घरपट्टी माफ करावी, असा विषय सभेत घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतू घरपट्टी माफ करण्याचा अधिकार पालिकेला नसल्यामुळे हा विषय अजेंडयावर घेणे शक्य नव्हते, असेही श्री.रघुवंशी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या