Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगावमधील पाच संशयितांना अटक

जळगावमधील पाच संशयितांना अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील विसापूर फाटा येथे तीन सख्या भावासह चार जणांच्या हत्याप्रकरणी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येवून शहरातील पाच जणांना अटक केली. या संशयित आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

मृतांमधील काही जणांनी जळगावातील व्यक्तींना तीन लाखांत दोन किलो सोने देण्याचे आमीष दाखविले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

विसापूर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी नातीक कुंजीलाल चव्हाण (वय 40), त्याचा भाऊ नागेश कुंजीलाल चव्हाण (वय 16 ), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (35, रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा) आणि लिंब्या हब्र्या काळे (वय 22, रा.देऊळगाव सिद्धी, ता.नगर) यांची चाकूसह इतर शस्त्राने हत्या झालेली आहे.

याबाबत अक्षय कुंजीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अक्षय उंबर्‍या काळे आणि मिथुन उंबर्‍या काळे यांच्यासह सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाणे (ता. श्रीगोंदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एटीएम कार्डवरुन संशय

पोलिसांना घटनास्थळी एक एटीएम कार्ड सापडले होते. तेथील पोलिसांनी तपास केला असता, हे कार्ड जळगाव शहरातील व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता सुरेश नामक तरुणाने स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून जळगावातील पाच जणांना नगर जिल्ह्यात बोलावले होते. त्यानुसार जळगावातील दोन महिलांसह पाच जण खासगी वाहनाने विसापूर फाट्याजवळ गेले.

त्या ठिकाणी गेल्यानंतर जळगावातील व्यक्तींजवळील पैशांची बँग हिसकावून दोन जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळापळ सुरू होताच जळगावातील एका तरुणाने त्याच्याजवळील चाकूने हल्ला केला. दोघं गटात झटापटी झाली.

नरेश केले वार

वाद हातवाईवर आल्याने जळगावातील महिलांसह इतरांनी त्यांच्या सोबतच्या काही अंतरावरील वाहनाच्या दिशेन पळ काढला आणि ते वाहनात बसले. तर नरेश सोनवणे याने त्याच्याजवळील फोल्डींगच्या चाकूने सोन्याचे आमीष दाखवून फसवणूक करणार्‍यांवर वार केल्याची कबुली दिली, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

घटनास्थळावरुन जळगावातील पाचही जणांनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर नातीक चव्हाण, त्याचा भाऊ नागेश चव्हाण, श्रीधर चव्हाण व लिंब्या काळे यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी जळगावातील एका व्यक्तीचे एटीएम सापडल्यामुळे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी जळगाव गाठले.

यांना झाली अटक

या पथकाने जळगावातील हरीविठ्ठलनगरामधील संशयित नरेश उर्फ बाळा जगदिश सोनवणे (वय22), कल्पना किशोर सपकाळे (वय 40), आशाबाई जगदिश सोनवणे (वय 42), प्रेमराज रमेश पाटील (वय22) व योगेश मोहन ठाकूर ( वय22) यांना शनिवारी अटक केली. यातील नरेश, प्रेमराज हे बांधकाम अथवा इतर मजुरीचे काम करतात. योगेश हा वाहन चालक आहे. तर महिला गृहिणी आहेत. त्या देखील मजुरी करतात, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

जळगाव पोलिसांचे सहकार्य

याप्रकरणी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगावातील पोलिसांनी तपासकामी सहकार्य केले. आरोपींच्या शोध मोहिमेचे सूत्र नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम यांच्याकडे होते.

नगर येथील पोलीस पथक शुक्रवारी जळगावात आले. त्यांच्या मदतीला जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अलका शिंदे यांचे पथक धावले. नगर व जळगावातील संयुक्त पथकाने शोध मोहीम राबवून जळगावातील हरिविठ्ठलनगरामधील पाचही आरोपींनी ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या