Tuesday, May 14, 2024
Homeनगर1 कोटीची लाच प्रकरण; अभियंता वाघच्या घरांना एसीबीने ठोकले सील

1 कोटीची लाच प्रकरण; अभियंता वाघच्या घरांना एसीबीने ठोकले सील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल असलेला नगर एमआयडीसीचा तात्कालीन उपअभियंता व सध्या धुळे एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता असलेला गणेश वाघ हा अद्याप नाशिक लाचलुचप प्रतिबंधक विभागाला मिळालेला नाही. त्याच्या मागावर पथके आहेत. त्याचे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा येथे घरे असून ते सील बंद करण्यात आले आहेत. तो कार्यरत असलेल्या धुळे येथील भाडोत्री घरही सील लावण्यात आले आहे. त्याचा शोध घेतला जात असून तो मिळून आल्यानंतर याप्रकरणी आणखी उलगडा होण्याची शक्यता पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांनी व्यक्ती केली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी दुपारी नाशिक लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना अटक केलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड (रा. नागापूर, नगर, मूळ रा. चिंचोली, ता. राहुरी) याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (सोमवारी) संपणार असून त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सहा.अभियंता गायकवाड याच्या नागापूर व चिंचोली येथील घराची तपासणी केली. त्याच्या घरात साडेतीन ते चार लाखांच्या वस्तू आढळून आल्या. त्या जप्त न करता त्याची नोंद लाचलुचपत विभागाने घेतली असल्याची माहिती अधीक्षक वालवलकर यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदाराकडून 1 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना सहा.अभियंता गायकवाडला लाचलुचपत विभागाच्या पथकाने नगर शहराजवळील शेंडी बाह्यवळण रस्त्यावर शुक्रवारी पकडले. गायकवाड याने कार्यकारी अभियंता गणेश वाघ याच्यासाठी ही रक्कम स्वीकारली असल्याचे सिध्द झाले आहे. गणेश वाघ सध्या धुळे एमआयडीसी येथे कार्यकारी अभियंता आहे. तो पूर्वी नगरला उपअभियंता म्हणून कार्यरत होता. जलवाहिनीच्या तसेच इतर कामांची देयके अदा करण्यासाठी लाचेची रक्कम मागण्यात आली होती.

वाघ धुळे येथील भाडोत्री घरात राहत असल्याची माहिती असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच तो गायब झाला आहे. तेथील घरी लाचलुचपत विभागाचे पथक गेले होते. त्यांनी सदरील घर सील बंद केले आहे. त्याचे दुसरे घर पुण्यात आहे. तेथे त्याची पत्नी व मुलगी राहते. ते घर देखील बंद असून त्याला सील लावले आहे. याशिवाय त्याचे संभाजीनगर, बुलढाणा शहरातही घर आहे. अमित गायकवाडला शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतल्यापासून गणेश वाघचा शोध सुरू आहे. रविवारी सायंकाळपर्यंत तो मिळाला नव्हता. त्याच्या शोधासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या