Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर-कोल्हार-कोपरगाव महामार्गाची झाली चेष्टा

नगर-कोल्हार-कोपरगाव महामार्गाची झाली चेष्टा

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

नगर ते कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाची महाभयंकर दुरवस्था झाली. मात्र त्याकडे कुणालाही गांभीर्याने लक्ष देण्यास सवड मिळेना.

- Advertisement -

किंबहुना संबंधित अधिकार्‍यांच्या स्वार्थापोटी आणि दुर्लक्षित करण्याच्या मनोवृत्तीने हा चाललेला खेळखंडोबा आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. महामार्ग या दर्जाचा देखील असू शकतो यावर उपहासात्मक थट्टा केली जात आहे. एकप्रकारे हा चेष्टेचा विषय बनला असल्याचे दिसते.

नगर-मनमाड महामार्गाचे काम दोन टप्प्यांमध्ये विभागलेले आहे. त्यातील एक टप्पा म्हणजे कोल्हार ते कोपरगाव आणि दुसरा टप्पा अर्थात कोल्हार ते नगर. मात्र दोन्ही टप्प्यातील या राष्ट्रीय महामार्गाची झालेली दैना सोडविण्याची कुणाचीही मानसिकता कशी दिसेना?

हा महामार्ग खड्ड्यात हरवल्यामुळे महामार्ग गेला कुणीकडे? असे म्हणत शोधण्याची वेळ येऊन ठेपली. दुर्लक्षित राहिलेल्या या महामार्गाचे भल्यामोठ्या खड्ड्यांच्या साम्राज्याने चाळण झाली. महामार्गावरील महाकाय खड्ड्याने इतका रस्ता व्यापला आहे की, आता तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी उपयोगाची ठरणार नाही.

कोल्हार ते नगर या महामार्गामध्ये ज्या ठेकेदाराकडे रस्त्याचे काम होते त्याने वेळेत काम करत नाही म्हणून त्याच्याकडील पैसे कापून घेऊन संबंधित विभागाने दुसरे टेंडर काढले व ते नाशिकच्या एका कॉन्ट्रॅक्टरला दिले. त्यास 6 महिन्यांची मुदत देण्यात आली. परंतु काम पूर्ण झाले नाही म्हणून आणखी मुदतवाढ दिली.

त्यांनी केलेले काम सध्यातरी कोठेही दृष्टीपथास येत नाही. याचा अन्वयार्थ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम निव्वळ कागदोपत्री झाले की काय? अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत. सदर कामासंदर्भात नगरच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांकडे तक्रार अर्ज केले. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात कुणीही रस दाखविला नाही असे समजते.

कोल्हार ते कोपरगाव या रस्त्याबाबत रोडवर खड्डे पडायला लागले म्हणून निर्मळ पिंपरी येथील टोल बंद करण्यात आला. टोल बंद झाल्यापासून रस्ता दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. टोल बंद झाल्यानंतर खड्डे बुजवले नाहीत, मात्र याची बिले काढण्यात आली आहेत की काय? हे तपासून पहावे लागेल. ठेकेदारच नसल्याने मात्र सध्या जाब विचारायचा कुणाला हा प्रश्न पडला आहे.

सदर महामार्गाचे काम शासनाच्या निधीमधून टेंडरद्वारे निघणार असल्याचे ऐकिवात येते. मात्र सद्यस्थिती पाहता राज्यातील रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचे गेल्या 6 महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर निधीअभावी बिले रखडलेली असल्याचे समजते.

असे असताना एकाच वेळी, एकाच दमात या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण करायला शासनाकडे एवढा मोठा निधी उपलब्ध होईल का? जर तो होणार नसेल तर एखाद्या चांगल्या एजन्सीला बिओटी तत्वावर काम देऊन वेगाने महामार्गाचा प्रश्न निकाली काढता येईल का? हे पाहणे अगत्याचे ठरते. महामार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर लक्ष घालणे गरजेचे आहे. याबाबत मार्ग शोधून पाठपुरावा करावा, अशी जनतेची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या