Friday, April 26, 2024
Homeनगरनगर-कोल्हार महामार्गावरील निळवंडेच्या पुलाचे काम रेंगाळले

नगर-कोल्हार महामार्गावरील निळवंडेच्या पुलाचे काम रेंगाळले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापूतील 182 गावांतील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पिंपरी निर्मळ शिवारातील अंत्य कालव्याची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र नगर-कोल्हार चौपदरी रस्ता क्रॉसींग करणार्‍या पुलासाठी रस्ता खोदून दोन महिने झाले मात्र काम बंद आहे. या खोदलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत.

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, अकोले, श्रीरामपूर तालुक्यातील कायमच दुष्काळी 182 गावांतील 68 हजार हेक्टरवरील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला. 50 वर्षे रखडल्यानंतर आता मुख्य कालव्यांच्या कामाने गती घेतली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या मुख्य कालव्यांची चाचणी करण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. या कालव्याच्या पिंपरी निर्मळ शिवारातील नगर कोल्हार रस्ता क्रॉसींग करणार्‍या पुलासाठी जलसंपदा विभागाने जवळपास सव्वादोन कोटी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केले आहेत.

या कामाची निविदा निघून दोन महिन्यांपूर्वी या कंत्राटदाराने रस्त्याच्या एका बाजूने रस्ता खोदला आहे. मात्र दोन महिने होऊनही पुढील कोणतेच काम सुरू झालेले नाही. याठिकाणी चौपदरी असणारा रस्ता वन वे करण्यात आला आहे. या वनवेमुळे येथे कायमच वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अनेक अपघात घडत असून लक्षात न आल्याने रात्री या खड्ड्यात अनेक दुचाकीस्वार पडत असल्याने हा खोदलेला रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. जलसंपदाने आवश्यक तेवढा निधी देऊनही दोन महिन्यांपासून कंत्राटदाराने हे काम कोणाच्या सांगण्यावरून रखडविले आहे, असा प्रश्न निळवंडे लाभधारक शेतकरी व प्रवाशांना पडला आहे. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असून राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने संबंधित कामचुकार कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निळवंडे लाभधारक शेतकरी व प्रवाशांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या