Monday, April 29, 2024
Homeनगरनगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा बैठक

नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा बैठक

कर्जत|तालुका प्रतिनिधी|Karjat

तालुक्यातून जाणार्‍या नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्ग क्र. 516 (अ) च्या कामासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि. 6) अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावांचा राहिलेला भूसंपादन मोबदला, महामार्गाच्या पूर्णत्वासाठी येत असलेल्या अडचणी त्यामध्ये वनविभाग, महसूल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्यामध्ये तालुक्यातील मिरजगाव व निमगाव गांगर्डा या गावांची असलेली पाणीपुरवठा योजना महामार्गाच्या लगत येत असल्याने या महामार्गाच्या कामास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या योजनेची जलवाहिनी स्थलांतरित करणे आदी विषयांवर आ. रोहित पवार यांनी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

त्याचबरोबर न्हावरे, श्रीगोंदा, कर्जत, माही जळगाव, जामखेड या 548 (ड) राष्ट्रीय महामार्गाचे एका टप्प्यात काम झाले असून श्रीगोंदा ते जामखेड या दुसर्‍या टप्प्यातील कामाला मंजुरी मिळण्यासाठी तसेच हा महामार्ग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीही आ. पवार यांनी चर्चा केली. या महामार्गामुळे पुणे, नगर, बीड हे जिल्हे जोडले जाणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, नगर व श्रीगोंदा विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहायक संचालक नगर रचना विभागाचे बागूल, नगर रचनाकार राजेश पाटील, वीज विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामातील अडथळे दूर होऊन महिनाभराच्या कालावधीमध्ये या महामार्गाचा विषय कसा मार्गी लागेल याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. या महामार्गाचा फायदा नगर जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याच्या जोडणीसाठी होणार आहे.

दोन्हीही राष्ट्रीय महामार्गांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी आमदार रोहित पवार यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला असून त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. कामास विविध अडथळे येत असल्याने हे काम संथ गतीने सुरू होते. आता हे काम कमी कालावधीत होणार असून आता या कामास गती मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या