Thursday, April 25, 2024
Homeनगरदहा दिवसांत नगर जिल्हा बँके निवडणूक बिगूल

दहा दिवसांत नगर जिल्हा बँके निवडणूक बिगूल

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी 1 हजार 371 शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था 832, बिगर शेती संस्था 1 हजार 376 असे एकूण 3 हजार 579 मतदार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काल जिल्हा बँक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी मार्च 2020 ला प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर करोना संसर्गामुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्या टप्प्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिला आहे. त्यानुसार विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून बँकेच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी बँकेच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या पंचवार्षीक निवडणूकीचा कार्यकाल मागील वर्षीय संपुष्टात आला होता. मात्र, राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या कामकाजामुळे जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली होती. याविरोधात काही सेवा संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने राज्य शासनाचा आदेश रद्द ठरवत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आला आणि जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुरुवारी (दि.7) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतीम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सेवा सोसायटी मतदार

प्राथमिक कृषी पत पुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारयादीमध्ये तालुकानिहाय असलेली मतदार संख्या- अकोले 84, जामखेड 47, कर्जत 74, कोपरगाव 114, नगर 109, नेवासा 131, पारनेर 105, पाथर्डी 80, राहाता 73, राहुरी 110, संगमनेर 135, शेवगाव 70, श्रीगोंदा 170, श्रीरामपूर 69 एकूण 1371.

शेतीमाल प्रक्रिया, पणन संस्था मतदार

शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्थांमध्ये दूध संस्था, पशु पैदास संस्था, वराह पालन, कुक्कुट पालन, मच्छीमार, शेळी-मेंढी पालन, खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, जिनींग प्रेसिंग संस्था, शेतकरी संघ, ऑईल मिल्स्, सुत गिरण्या, आदी संस्था असून त्यांची तालुकानिहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे- अकोले 83, जामखेड 16, कर्जत 22, कोपरगाव 82, नगर 35, नेवासा 28, पारनेर 40, पाथर्डी 15, राहाता 77, राहुरी 37, संगमनेर 325, शेवगाव 26, श्रीगोंदा 32, श्रीरामपूर 14 एकूण 832.

बिगर शेती संस्था मतदार

बिगर शेती संस्थांमध्ये नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, नागरी सहकारी बँका, पगारदार नोकरांच्या पतसंस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, औद्योगिक संस्था, औद्योगिक उत्पादक संस्था, औद्योगिक मजुरांच्या संस्था, ग्रामोद्योग संघ, वाहतूक संस्था, हातमाग विणकर संस्था यांचा समावेश असून तालुकानिहाय मतदार पुढीलप्रमाणे- अकोले 58, जामखेड 48, कर्जत 64, कोपरगाव 132 (34 व्यक्ती सभासद) असे एकूण 166, नगर 222, नेवासा 85, पारनेर 79, पाथर्डी 29, राहाता 114 (25 व्यक्ती सभासद) असे एकूण 139, राहुरी 102, संगमनेर 230 (1 व्यक्ती सभासद) असे एकूण 231, शेवगाव 22, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 62 असे एकूण 1316 संस्था व 60 व्यक्ती सभासद असे 1376 मतदार आहेत.

272 ठराव अप्राप्त

जिल्हा बँकेच्या मतदारयादीसाठी मागविण्यात आलेल्या ठरावांपैकी एकूण 272 ठराव निर्धारित वेळेत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे त्या संस्थांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघात 18, बिगरशेती संस्था मतदारसंघात 180 तर शेतीपूरक प्रक्रिया व पणन संस्थांमध्ये 74 संस्थांचा समावेश आहे.

……………..

- Advertisment -

ताज्या बातम्या