Friday, May 10, 2024
Homeनगरलाडक्या श्रींची घरोघरी प्रतिष्ठापना

लाडक्या श्रींची घरोघरी प्रतिष्ठापना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाडक्या श्री गणेशाचे शनिवारी नगर शहरात उत्साहात आगमन झाले. करोना संसर्गाचे संकट असले तरी घरगुती श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी नगरकरांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्यांचे वातावरण होते. शहराचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात शनिवारी सकाळी नऊ वाजता मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना केली.

- Advertisement -

सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे यांच्यासह पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. यंदा नगरमधील गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल गणेश मंदिरात यंदा भाविकांंना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नाही. परंतु दहा दिवस मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती सोशल मीडियातून थेट पाहता येईल, असे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले.

दरम्यान, श्रींच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट असले तरी गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे. घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळपासून बच्चेकंपनीसह नगरकरांची खरेदीची लगबग सुरू होती. सावेडी, केडगाव व मध्यशहरात नगरकरांची गर्दी पहावयास मिळाली.

सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देत नगरकरांच्या उत्सावाला थाटात सुरूवात झाली. करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यासह जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव एकदम साध्या पध्दतीने करण्यात येत आहे. करोनाच्या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी यासाठी गणेशभक्तांनी प्रार्थना करत घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. शासकीय नियमामुळे यंदा उत्सावातील जल्लोष मात्र नाहीसा झाला आहे.

शहरातील चितळे रोड, दिल्लीगेट, माळीवाडा, सावेडीतील पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी चौकात गणेश मूर्ती व पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल लागले होते. उत्सव काळातील खरेदीसाठी नगरकर सकाळपासूनच बाहेर पडले. दिवसभर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. खरेदी करताना मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन केले जात होते.

मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्ताच्या हाती गुलाल व सॅनिटाइझर असल्याचे दिसले. बालगोपालांसह सर्वांचा उत्साह होता. प्रशासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच मंडप उभारणीस परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे यंदा मंडपविना गणेशोत्सव साजरा होत आहे.

अनेक सार्वजनिक मंडळांनी गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा प्रथमच सार्वजनिक मंडळांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. ज्या सार्वजनिक मंडळाला श्रींची स्थापना करायची आहे त्यांना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

तसेच मंडप उभारता येणार नाही. आरतीसाठी पाच जणांनाच मर्यादा घालण्यात आली आहे. गणेश मंडळांनी आरती, गणेश दर्शन सोशल मीडियावरून लाईव्ह करावे, जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व सार्वजनिक मंडळांना शहर पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत.

मूर्ती चार फुटापेक्षा कमी असावी, मंडप उभारू नये, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, तसे केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या