Saturday, April 27, 2024
Homeनगरप्रमुख रस्त्यांवरील सुमारे 270 अतिक्रमणांवर हातोडा

प्रमुख रस्त्यांवरील सुमारे 270 अतिक्रमणांवर हातोडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर तसेच रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये घर व गाळ्यासमोर शेड मारून करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर मार्किंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आत्तापर्यंत शहरात 270 अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाकडून मार्किंग करण्यात आले आहे. त्याचा अहवाल कारवाईसाठी आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.

- Advertisement -

शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पथारी व्यावसायिक, हातगाडी विक्रत्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच अनेक ठिकाणी इमारतीमधील गाळ्यांसमोर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचाही परिणाम वाहतुकीवर होऊन नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी होतात. अस्तित्वातील रस्त्यावरही विनापरवाना बांधकाम झाल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. जावळे यांनी बैठक घेऊन मार्किंगचे आदेश दिले होते. चारही प्रभाग समिती कार्यालयांसाठी चार स्वतंत्र पथके आयुक्त डॉ. जावळे यांनी नियुक्त केली होती.

स्वतः आयुक्त डॉ. जावळे यांनी नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचार्‍यांसह पाहणी केली होती. प्रभाग समितीनिहाय नियुक्त पथकांनी बहुतांशी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवर मार्किंग केले आहे. सदरचे काम अंतिम टप्प्यात आहे. झेंडीगेट कार्यालयाच्या हद्दीतील काम अद्यापही सुरू आहे.

आत्तापर्यंत सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 79, माळीवाडा-शहर प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 72, झेंडीगेट प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, बुरूडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 81 अशा 270 अतिक्रमणांवर मार्किंग करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे प्राप्त झाली आहे. या अतिक्रमणांवर स्वतंत्र मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या