नगर शहरातील करोना रुग्णसंख्येत घट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नगरसह 18 जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद केले आहे. नगर शहरातील रूग्णांसाठी एक हजार 590 बेडची सुविधा तयार असून शहरात सध्या फक्त 938 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णापासून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल होणे आवश्यक आहे. गृह विलगीकरणमध्ये असलेले करोना बाधित रुग्ण नियमांचे पालन करत नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने नगरसह रेडझोनमधील 18 जिल्ह्यांत गृह विलगीकरण बंद केले आहे. नगर शहरातील बाधितांची संख्या गेल्या आठवड्यात कमालीची घटली आहे. त्यातच महापालिकेनेही तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी करत कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार 590 बेडची तयारी ठेवली आहे. नगर शहरात गुरूवारी फक्त 938 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील नटराज, जैन पितळे, बडीसाजन, डॉन बॉस्को, धर्मवीर स्व. अनिल राठोड, शासकीय तंत्रनिकेतन, केशव माधव, बूथ येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत आहेत. तेथील सेंटरमध्ये बेडही उपलब्ध आहेत. त्यामुळे गृह विलगीकरण बंद झाले तरी तेथे बाधितांची सोय होणार आहे. शासनाने गृह विलगीकरण बंदीचा निर्णय आता घेतला असला तरी नगर महापालिकेने मात्र गृह विलगीकरण पूर्वीच बंद केले होते, असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *