Friday, April 26, 2024
Homeनगरनगर अर्बन प्रकरणातील चौघा आरोपींची खंडपीठामध्ये धाव

नगर अर्बन प्रकरणातील चौघा आरोपींची खंडपीठामध्ये धाव

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणी सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यापैकी डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे व गिरीष अग्रवाल यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट पिटीशन याचिका दाखल केली आहे. यात आमच्यावर दाखल गुन्हा खोटा असून बँकेने आमची फसवणूक केली असल्याचे या चौघांचे म्हणणे आहे. खंडपीठाने बँकेसह पोलिसांना नोटीस बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.

नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 7 जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामध्ये डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओम प्रकाश आग्रवाल, निर्मल एजन्सी नगर आणि स्पंदन मेडिकेयर, पुणे यांचा समावेश आहे.

बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी आरोपी यांनी बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखेत कर्जप्रकरण दाखल केले होते. यासाठी आरोपी हे एकमेकांचे जामीनदार राहिले.

जामीनदार राहून या कर्जाच्या रक्कमेतून हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी, नगर व स्पंदन मेडिकेयर, पुणे यांच्याबरोबर संगनमत करून त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले. यानंतर रोहिणी सिनारे आणि उज्वला कवडे यांच्या वयक्तीक बँक खात्यावर कर्जाची रक्कम ट्रान्सफर करून कर्ज रक्कमेत गैरव्यवहार केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या कर्जप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार बँक प्रशासनाने चेगडिया समिती नेमली असून त्या समितीसमोर चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झालेली नसतानाही आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला असा आरोप डॉ. भास्कर सिनारे यांनी केला आहे. बँकेने आम्हाला अंधारात ठेऊन कर्जप्रकरण मंजुर करून घेतले. यामध्ये आम्हाला विश्‍वासात घेतले गेले नाही. यामुळे डॉ. रवींद्र कवडे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे व गिरीष आग्रवाल यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

दाखल गुन्हा खोटा असून आमचीच फसवणूक झाली असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. कोर्टाने बँकेसह पोलिसांना याप्रकरणी म्हणणे सादर करण्याचा आदेश काढला आहे. या फसवणूक प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

2014 मध्ये हे कर्जप्रकरणे मंजुर झाले. आता 2020 वर्षे चालू आहे. बँकेला सहा वर्षांनंतर कळाले की कर्जदारांनी मशनरी खरेदी केलेली नाही. वास्तविक पाहाता बँकेने कर्जप्रकरणे मंजुर केल्यानंतर कर्जदारांनी मशनरी खरेदी केली का नाही, याची एक महिन्याच्या आत पडताळणी करणे आवश्यक होते. त्याचे बीले घेणे आवश्यक होते. ते काम बँकेने केले नाही. तसेच आमच्या तिघांच्या नावाने (डॉ. सिनारे, डॉ. कवडे व डॉ. श्रीखंडे) 2014 मध्ये 17 कोटी 90 लाखाचे कर्जवितरण केले होते. यानंतर 2014 ते 2018 पर्यंत या कर्जखात्यात 17 कोटी 55 लाख भरले गेले आहे. याला फसवणूक कशी म्हणता येईल. कर्ज खात्यामध्ये भरलेले 17 कोटी 55 लाख रूपये आम्ही तिघांनी भरले नाहीत. हे कर्जखाते कोण चालवते असा आमचा प्रश्‍न आहे.

– डॉ. भास्कर सिनारे

- Advertisment -

ताज्या बातम्या