मुरकुटे-ससाणे समर्थकांचा श्रीरामपुरात एकत्रित जल्लोष

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत तालुक्यातील कट्टर विरोधक असलेल्या मुरकुटे- ससाणे गटाची सहमती एक्सप्रेस धावली.

दोघांच्या समजूतदारपणाच्या भूमिकेमुळे माजी आ. भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे प्रथमच श्रीरामपूर तालुक्याला दोन संचालक मिळाले आहेत. या दोघांच्या समर्थकांनी एकत्रीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि स्व. जयंतराव ससाणे यांच्यात नेहमीच एकमेकांच्या विरोधात संघर्ष पहावयास मिळाला. त्यात सोसायटी मतदारसंघातून दोघांपैकी एकजण आलटून पालटून निवडून येत असे. त्यामुळे दोघांपैकी एकाचा विजय होत असे तर दुसर्‍याचा पराभव होत असे. या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच मुरकुटे आणि ससाणे कुटुंबातील एकाचवेळी संचालक झाले आहेत.

श्रीरामपुरच्या राजकारणात मुरकुटे-ससाणे संघर्षाची किनार राहिलेली आहे. त्याचे पडसाद आमदारकी पासून गावपातळीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये पहायला मिळत असे. तसे जिल्हा बँक निवडणुकीतही सोसायटी मतदारसंघातून दोघेही एकमेकांच्या विरोधात होते. त्यात कधी भानुदास मुरकुटे यांनी बाजी मारली.

तर कधी ससाणे यांनी विजय मिळविला. याला केवळ मागील पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद. गतवेळी भानुदास मुरकुटे यांनी थेट निवडणूक न लढविता त्यांच्या गटाकडून इंद्रनाथ पाटील थोरात यांनी माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी ससाणे यांनी बाजी मारली होती.

या निवडणुकीत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्तीमुळे दोघेही संचालक म्हणून बिनविरोध निवडून आहेत. या दोघांच्या निवडीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या महिन्यात माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी ससाणे समर्थकांच्या आगाशे कट्ट्यास भेट दिली होती. त्यावेळी मुरकुटे-ससाणे सहमती एक्सप्रेस धावण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याचा अनुभव या निवडणुकीत अनुभवयास मिळाला.

दरम्यान, दोघांच्याही बिनविरोध निवडीचे वृत्त समजताच श्रीरामपुरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. करण ससाणे यांचे आगाशे कट्यावर तर भानुदास मुरकुटे यांचे अशोक कारखाना कार्यस्थळी तसेच शहरात फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. आगाशे कट्यावर ससाणे व मुरकुटे गटाने एकत्रीत जल्लोष साजरा केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लुारे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब काळे, लोकसेवा मंडळाचे नाना पाटील डुक्रे, सुनील ससाणे, संजय आगाशे, अशिष धनवटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, समीर ससाणे, दीपक कदम आदी उपस्थित होते.

सोसायटीच्या मतदारांचा हिरमोड

राज्यातील सर्वात सक्षम जिल्हा बँक म्हणून नगरचा लौकिक आहे. अशा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चुरस पहावयास मिळते. त्यात या मतदारसंघातील मतदारांची चंगळ असते. पण अनेक ठिकाणी या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने या मतदारांचा हिरमोड झाला आहे. या मतदारसंघात तगडे उमेदवार असल्याने विजयासाठी सर्वकाही करण्यात तयार असतात. मतदारांना सांभाळण्यासाठी या उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते. त्यातून मतदारांची पळवापळवी होते. तेथून पुढे मतदान होईपर्यंत या मतदारांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागतात. एवढेच नव्हेतर त्यांचे सर्व ‘लाड’ ही पुरवावे लागतात. पण यंदा या निवडणुका बिनविरोध झाल्याने सोसायटी मतदार संघातील मतदारांचे महत्व कमी झाले. परिणामी त्यांचा हिरमोड झाला आहे. विशेष म्हणजे सोसायटीचा आपल्या नावाचा ठराव करण्यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनाही झटका बसला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *